Abp Majha Impact :माझाच्या बातमीचा दणका! शहीद जवानाच्या अंतिम संस्काराला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
Abp Majha Impact : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या तयारीत दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई बडगा उगारण्यात येणार आहे.
Akola News अकोला : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रविण जंजाळ (Pravin Janjal) यांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या तयारीत दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई बडगा उगारण्यात येणार आहे. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव काल त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र या परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असतांना ही जिल्हा प्रशासनाने या गावात कुठलीही तयारी केली नाही, शिवाय कुठलाही अधिकारी देखील या परिसरात फिरकला नाही. हे संपूर्ण धक्कादायक वास्तव सर्वप्रथम 'एबीपी माझा'ने लावून धरत ही बातमी प्रसारित केली होती. परिणामी माझाच्या बातमीची दखल घेत या विषयी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी आज विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे विषय लावून धरला. अंत्यसंस्कार स्थळी प्रशासनाकडून कोणतीच तयारी करण्यात आली नव्हती, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांने शहीदाच्या कुटुंबियांची साधी विचारणा देखील केली नव्हती हा संपूर्ण प्रकार असंवेदनशीलतेचा असून यामूळेच शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला विलंब झाल्याचा आरोप शहीदाच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी केला होता. परिणामी आता या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आदेश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) कुलगाम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केले . मात्र या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद असून यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ (Pravin Janjal) या जवानाचा देखील समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर एकच शोककळा पसरली आहे.
अकोल्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे येथे येत आहे. मात्र या परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस आहे. असे असतांना मात्र जिल्हा प्रशासनाने या गावात आद्यप कुठलीही तयारी केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी गावकरी आणि शहीद प्रवीण यांचे भाऊ प्रशासना विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रशासनावर आपला रोष व्यक्त करत सरकारचा निषेध केला. अद्याप ही प्रशासनाचे कुठलेही अधिकारी गावात पोहचले नाहीत. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या