(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नारायण राणे ते अनिल देसाई, महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार!
Retirement of Rajya Sabha MP: राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे.
Retirement of Rajya Sabha MP in 2024: नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग आणि दुसरीकडे राज्यसभेतून (Rajya Sabha) 2024 वर्षात तब्बल 68 राज्यभसा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचा (Central Minister) समावेश आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करुन निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार हे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आहेत. तर, महाराष्ट्रातील (Maharashtra News) 6 खासदार महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच,
यंदाच्या वर्षात राज्यसभेतून भाजपचे 60 खासदार निवृत्त होणार
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच, तब्बल 60 खासदार भाजपचेच आहेत. यापैकील 57 खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्री मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावांचा समावेश होतो.
महाराष्ट्रातून 2024 मध्ये कोणते खासदार निवृत्त होणार?
- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
- केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
- काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
- भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
- राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण
2024 मधून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातील
2024 मध्ये देशभरातील अनेक खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होऊन ते निवृत्त होणार आहेत. या सर्व खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशातील तब्बल 10 राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा खासदारांचा समावेश आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातून पाच, कर्नाटक आणि गुजरातमधून चार, ओदिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमधून प्रत्येकी तीन, झारखंड आणि राजस्थानमधून प्रत्येक दोन, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगढ, हरियाणामधून प्रत्येकी एक खासदार निवृत्त होणार आहे.