Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Nagpur News: छत्रपती शिवरायांच्या कार्याची जाण कोणालाच राहिलेली नाही. महाराष्ट्राने शिवाजी महाराजांना फक्त आपल्यापुरता संकुचित केले. महाराष्ट्रात आज उथळ शिवभक्ती पाहायला मिळते, असे परखड मत विजय देशमुख यांनी व्यक्त केले.
नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वपुरुष आहेत. मात्र, दुर्दैवाने आपण त्यांना महाराष्ट्रपुरतं मर्यादित केल्याचे मत पहिले जागतिक शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व शिवकथाकार विजयराव देशमुख (Vijayrao Deshmukh) यांनी व्यक्त केले आहे. जळगावमध्ये आजपासून चार दिवस "पहिले जागतिक विश्व शिवचरित्र साहित्य संमेलन" पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'शी बोलताना शिवकथाकार व संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या नेत्यांवर आगपाखड केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याचे विस्मरण आपल्याला झालेले आहे. भाषावर प्रांतरचनेनंतर दुर्दैवाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरतं मर्यादित केले आहे. टिळकांच्या काळात अशी स्थिती नव्हती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मान्यता होती.
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरतं संकुचित करणे ही राजकीय नेतृत्वाची चूक आहे. राजकीय नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त तोंडी लावण्यापुरतं वापरतं. मात्र, त्यांचे विचार स्वीकारत नाही, अशी खंत विजयराव देशमुख यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात शिवरायांची उथळ भक्ती पाहायला मिळते: विजयराव देशमुख
महाराष्ट्रात आज शिवाजी महाराजांची उथळ भक्ती पाहायला मिळत असून फक्त राजकारणापुरतं (Maharashtra Politcs) छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवरायांचा महाराष्ट्र शिवराळ महाराष्ट्र झाल्याचं मत ही विजयराव देशमुख यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत ठेवलं होते. मात्र, आज महाराष्ट्राच्या गावागावात जातींमध्ये फूट पडली आहे. राजकारण जातीच्या माध्यमातून खेळलं जात असून ही दुर्दैवी स्थिती आहे. ही स्थिती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अभिप्रेत नाही, असे ही देशमुख म्हणाले. शिवचरित्रावर आजवर एकही जागतिक दर्जाचे साहित्य संमेलन झालेले नाही. तसेच शिवचरित्र अथांग आहे. रोज काही ना काही नवीन संशोधन होऊन माहिती समोर येत आहे. त्यामुळे आपण शिवचरित्रावर पहिलं जागतिक साहित्य संमेलन आयोजित केल्याची माहिती विजयराव देशमुख यांनी दिली.
आणखी वाचा