28th June Headlines: संजय राऊतांच्या जामीनावरील ईडीच्या याचिकेवरील सुनावणी, लोकसभा जागावाटपासंदर्भात मविआची बैठक
यूपीएससीची पूर्व परीक्षेसंबंधी वाद निर्माण झाला असून त्याविरोधात विद्यार्थी दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मुंबई: राज्यातील लोकसभेच्या जागावाटपासंबंधी आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. तसेच आज पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. यासह दिवसभरातील इतर घडामोडी खालीलप्रमाणे,
यूपीएससी पूर्व परीक्षेसंबंधित याचिकेवर सुनावणी
यूपीएससी पूर्व परीक्षेचा वाद दिल्ली हायकोर्टाच्या दारात पोहोचला आहे. अभ्यासक्रमाबाहेरचे कठीण प्रश्न आल्यानं विद्यार्थ्यांची नाराजी असल्याचं चित्र आहे. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेबद्दल वाद निर्माण झाला असून आता विद्यार्थ्यांच्यावतीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. 2024 साठी विरोधकांची एकजुट, मध्य प्रदेश राजस्थानसह आगामी निवडणुका, राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा या पार्श्वभूमीवर ही बैठक. पक्षात प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे या दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिली कार्यकारिणी आहे. कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होतेय, पण सुप्रिया सुळेंचा संघटनेतला मोठा रोल आजच्या बैठकीपासून अधिकृतरीत्या सुरु होईल.
सध्या महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलाची बरीच चर्चा सुरु झालीय. अजित पवार यांनीच पक्षाच्या व्यासपीठावर थेट जाहीरपणे संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पाठोपाठ ओबीसी समाजाला नेतृत्व मिळावं असं भुजबळांनी म्हंटल. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत थेट या मुद्द्यावरच चर्चा अपेक्षित नसली तरी नेत्यांचा कल मात्र या बैठकीतून घेतला जाईल. आजच्या या बैठकीसाठी सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र वर्मा, फौजिया खान या नेत्यांची उपस्थिती असेल. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास आधी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यानंतर कार्यकारिणीची बैठक असणार आहे.
लोकसभा जागा वाटप संदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक
लोकसभा जागा वाटप संदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. तीनही पक्षांनी पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर आता एकत्रित बैठक होतेय. राष्ट्रवादीकडून अजित पवार, काँग्रेसकडून अशोक चव्हाण उपस्थित राहणार. तीनही पक्षांमध्ये लोकसभा जागावाटप संदर्भात काही चर्चा झाली यावरती पहिल्यांदा चर्चा होईल. या बैठकीनंतर पुन्हा पक्षांतर्गत बैठका होतील. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल.
मान्सून अपडेट
महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसाठी आज यलो अलर्ट ठेवण्यात आला आहे. सोबतच रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट ठेवण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पालखी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आज पादुकांजवळ आरती आणि तिसरे उभे रिंगण पार पडेल. त्यानंतर पालखी पंढरपूर मुक्कामी असेल.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात आज वाखरी येथे पादुका आरती झाल्यावर दुपारी तिसरे उभे रिंगण पार पडेल. तुकोबारायांची पालखी आज पंढरपूर मुक्कामी असेल.
आजच्या सुनावण्या
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी ईडी नं दाखल केलेल्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी. अनिल सिंह यांचा युक्तिवाद सुरू आहे. संजय आणि प्रवीण राऊत यांचा मंजूर जामीन रद्द व्हावा आणि पीएमएलए कोर्टानं जामीन देतांना, ईडी ओढलेले कडक ताशेरे निकालपत्रातून रद्द व्हावे, ही आहे ईडी ची मागणी आहे.
- कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणी सीबीआय नं दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. 28 जूनपर्यंत वानखेडे यांना हायकोर्टानं अटेकापसून संरक्षण दिलेलं आहे. सीबीआय आज याप्रकरणातील केस डायरी हायकोर्टात सादर करणार.
शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांनी जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. एनआयए आज आपली बाजू कोर्टासमोर सादर करणार. - सोशल मीडियावर शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणातील संशयीत आरोपी सागर बर्वेची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं, त्याला कोर्टात हजर करणार.
- पर्यावरण, ट्राफिक यांसह अन्य नागरी-सामाजिक समस्यांबाबत विविध जनहित याचिकांवर हायकोर्टात दिवसभर सुनावणी.