Maharashtra Rain : राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच नाही
Maharashtra Rain : पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

मुंबई : यंदा मान्सून उशिरा (monsoon 2023) दाखल झाला आणि जुन महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात तोडफार पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले होते. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळे पावसाचा मोठा खंड पडला आहे. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
राज्यात 1 जून ते 11 सप्टेंबर या कालावधीचे सरासरी पर्जन्यमान 890.4 मिलीमीटर असून, या खरीप हंगामात आतापर्यंत प्रत्यक्षात 766.0 मि.मी म्हणजेच, 11 सप्टेंबरपर्यंतच्या सरासरीच्या 86 टक्के एवढा पाऊस पडलेला आहे. दरम्यान राज्यामध्ये 25 जुलै ते आतापर्यंत 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 453 महसूल मंडळांमध्ये 21 पेक्षा जास्त दिवसाचा खंड पडला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची परिस्थिती बिकट असल्याचे चित्र आहे.
प्रकल्प कोरडे...
राज्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडली आहे. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिकं तर अक्षरशः करपून गेली आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आजघडीला 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 96 टक्के होता. त्यामुळे पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पातील पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे.
राज्यातील पेरणीची परिस्थिती...
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत प्रत्यक्षात 141.09 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 99 टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.72 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.30 लाख हेक्टर, तूर पिकाची 11.15 लाख हेक्टर, मका पिकाची 9.11 लाख हेक्टर, तसेच भात पिकाची 15.28 लाख हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे. खरीप हंगाम 2023साठी 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यानुसार राज्यात 19 लक्ष 72 हजार 182 क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे.मात्र असे असतांना अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:























