सार्वजनिक विहिरीवर पाणी भरताना 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, हिंगोलीतील घटना
हिंगोली तालुक्यातील माळहिवरा गावात 13 वर्षीय राहुल वसंतराव भोसले हा तरुण गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता.
हिंगोली : यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच चांगलंच ऊन तापायला लागलं आहे. पाणीटंचाईच्या झळानाही सुरुवात झाली आहे. हिंगोलीत पाणीटंचाईचा पहिला बळी गेला आहे. सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरत असताना 13 वर्षीय मुलाचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगोलीत घडली आहे.
हिंगोली तालुक्यातील माळहिवरा गावात 13 वर्षीय राहुल वसंतराव भोसले हा तरुण गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. पाण्याने भरलेली बादली बाहेर काढत असताना ही बादली विहिरीच्या आतील कठड्याला आदळली ती बादली काढत असताना राहुलचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. विहिरीत पडल्यानंतर रालुलचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत राहुलचा मृतदेह बाहेर काढला.
एकूणच पाणी टंचाईच्या झळांना आता सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र गावकऱ्यांना पाणी मिळत नाही आणि याच पाणीटंचाईमुळे दरवर्षी अनेकांचा जीव जातो. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात पहिला बळी या पाणीटंचाईने राहुलचा घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ही जीवघेणी पाणीटंचाई केव्हा संपणार हाच प्रश्न आहे.