मोठी बातमी : पंकजा मुंडे निवडून न आल्यास सचिन गेला, व्हायरल व्हिडीओनंतर सचिन मुंडे यांचा अपघाती मृत्यू
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन असं म्हणणाऱ्या सचिनचा अपघाती मृत्यू झाला आहे.
Latur News: लातूर : भाजपच्या (BJP) बीडच्या (Beed News) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला, असा व्हिडिओ करणाऱ्या तरुणाचा अपघाती (Accident News) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याने आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकताच 4 जून रोजी देशासह बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. या निकालानंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण होतं.
आता दोन दिवसानंतर वातावरण निवळले आहे. पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र काल एक घटना घडली आणि पुन्हा उलट सुलट चर्चेला उधाण आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सचिन कोंडिबा मुंडे हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात यस्तर या गावचा रहिवासी होता. सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंकजा मुंडे यांचा विजय झाला नाही तर सचिन गेला असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी 7 जून म्हणजेच काल रात्री साडेआठ नंतर सचिनचा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला.
बोरगाव पाटीजवळ काय झालं?
अहमदपूर इथून येलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एसटी महामंडळाची बस नित्यनियमाने निघाली होती. बोरगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणाला बसचालकाला रस्त्यावर पडलेला इसम दिसला. घाईत बस चालकाने गाडी वळवली मात्र समोरच्या चाकापासून संरक्षण करता आलं मात्र मागील चाक सचिन मुंडे यांच्या अंगावरून गेलं. या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबतची माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली. किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आता पोलीस पुढील तपास करत आहोत.
पोलीस आणि एस टी महामंडळाच्या वाहनचालकांच्या माहितीनुसार हा अपघात आहे. मात्र सचिन मुंडे यांनी काही दिवसापूर्वी केलेला व्हिडिओ आणि आजची घटना याची सांगड घालून पंकजा मुंडे यांच्यासाठी सचिन मुंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं सत्य काय याबाबत आता उलट सुलट चर्चा होत आहे