Vande Bharat Express : कोल्हापूर ते मुंबई 'वंदे भारत' कधी सुरु होणार? वेळापत्रक अन् स्टाॅप किती असणार माहिती आली समोर
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे कोच ज्याठिकाणी तयार होतात त्याठिकाणी सुद्धा गती वाढवण्यात आली आहे. वंदे भारत सुरु झाल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला थेट फायदा होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई 'वंदे भारत' एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस दोन महिन्यात सुरु करण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. कोल्हापूरकरांचे वंदे भारतचे स्वप्न पूर्ण झाल्यास मुंबई फक्त सात तासांमध्ये गाठता येणार आहे. वंदे भारतसाठी संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे हातकणंगले ते मिरज दरम्यान मजबुतीकरण आवश्यक असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे. कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत सुरु होण्यासाठी महाडिक यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे कोच ज्याठिकाणी तयार होतात त्याठिकाणी सुद्धा गती वाढवण्यात आली आहे. वंदे भारत सुरु झाल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला थेट फायदा होणार आहे.
काय आहे वेळापत्रक?
वंदे भारतच्या संभाव्य वेळापत्रकानुसार कोल्हापुरातून पहाटे 5.50 मिनिटांनी सुटेल. मिरजेत 6 वाजून 18 मिनिटांनी पोहोचेल. सांगली (6.35), सातारा (7.55), पुणे (10.03) कल्याण (12.05), ठाणे (12.25), सीएसटी 12.56 मिनिटांनी पोहोचेल.
परतीची वेळ कशी असेल?
सीएसटीवरून सायंकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी सुटेल. ठाणे (5.25), कल्याण (5.39), पुणे (7.55), सातारा (9.25), सांगली (11.33), मिरज (11.45) कोल्हापुरात 11 वाजून 55 मिनिटांनी येईल.
दुसरीकडे,सद्यस्थितीत कोल्हापूर ते मुंबई मार्गावर रेल्वे प्रवाशांना लागणारा वेळ आणि अवघी एक गाडी असल्याने अनंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. कोल्हापूरकरांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी वेगवान प्रवासाच्या आशा नक्की पल्लवित झाल्या आहेत. मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरांमधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. मात्र, प्रवासात खूप वेळ जात असल्याने मोठी कुचंबणा होत आहे. वंदे भारत सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्या, तरी तत्काळ सुरू होईल याची शक्यता कमी आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे. मात्र, ट्रेनला लागणाऱ्या वेळेमुळे अनेकजण कोल्हापूरला येण्याचे टाळतात.
इतर महत्वाच्या बातम्या