Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील मानेंच्या घराकडे जाणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांशी झटापट
धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
शिवसैनिकांकडून घराकडे जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांना ताब्यात घेतले. यावेळी काही काळ शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची बाजू समजून घेणार असल्याचे म्हटले आहे.
तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. त्यामुळे संभाजी महाराज पुतळ्यानजीक शिवसैनिकही ठाण मांडून बसले आहेत. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि संजय पवार करत आहेत. मोर्चाला शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावताना खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. गली गली मै शोर है माने चोर है अशाही घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
माने गटाची दोनवेळा गद्दारी, लायकी नव्हती, तरी उद्धव साहेबांनी पाठीवर थाप मारली
मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले.1 शिवसैनिक 100 जणांना भारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना मुरलीधर जाधव म्हणाले की, माने गटाने दोनवेळा गद्दारी केली आहे. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरेंनी पाठीवर थाप मारली. पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नसल्याचे ते म्हणाले.
धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती
शिवसैनिकांकडून खासदार धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी आपल्याला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचं काय चुकलं? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घराती भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकलं? अशी विचारणा शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांना केली आहे.
मोर्चाला विरोध करू नका, खासदार मानेंकडून आवाहन
बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी मोर्चाला विरोध न करण्याचे आवाहन सोशल मीडियातून केलं आहे. धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडताना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं नेमकं हे का घडलं? कशामुळं घडलं? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये.