(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ruturaj Patil on Old Pension Scheme : 'त्या' 40 आमदारांना सभागृह बंद पाडता येणार नाही पण आम्ही बंद पाडू; जुन्या पेन्शनवरुन आमदार ऋतुराज पाटील स्पष्टच बोलले
शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्यासाठी कोल्हापुरात गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
Ruturaj Patil on Old Pension Scheme : शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्यासाठी कोल्हापुरात गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय विराट मोर्चा काढण्यात आला. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तब्बल 90 संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आमदार ऋतुराज पाटील यांनी जुन्या पेन्शनवरुन शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिला. जुनी पेन्शन मागणीच्या मोर्चात ऋतुराज पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
ऋतुराज पाटील (Ruturaj Patil on Old Pension Scheme) बोलताना म्हणाले की, "त्या 40 आमदारांना सभागृह बंद पाडता येणार नाही पण आम्ही बंद पाडू. सरकारने लक्षात घेतलं पाहिजे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है. तुम्हाला सत्तेतून खाली खेचण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही आमदार केला आहात तर तुमच्या प्रश्नासाठी उभा राहणं हे कर्तव्य आहे." दरम्यान, गांधी मैदानातून विराट मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी मोर्चामध्ये शेकडो कर्मचारी एकवटले होते. गांधी मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते. नका करु जुन्या पेन्शनची बेरीज, नाही तर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस. आमचं ठरलंय, आता आम्ही नाही मागे हटणार, जुनी पेन्शन घेऊनच शांत बसणार आदी फलक लक्ष वेधून घेत होते.
सतेज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, सतेज पाटील यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल करताना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, "गेल्या 10 ते 15 वर्षांपासून नव्या पेन्शनच्या भूमिकेवरुन अन्याय होत आहे. देशात सात टक्के महागाई असताना परतावा मात्र 2 टक्के दिला जात आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी उणिवा भोगल्या आहेत. 14 तारखेला काम बंद आंदोलनात कोल्हापुरात एकही शासकीय कार्यालय चालू राहता कामा नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत."
ते पुढे म्हणाले की, "एलआयसीला अदानीला 34 हजार कोटी देताना आकडेवारी आठवली नाही का? एसबीआयचे पैसे अदानीत गुंतवले, त्यावेळी आठवलं नाही का? त्यावेळी का आठवलं नाही. एनपीएमधील 12 लाख कोटींची कर्ज केंद्र सरकारने माफ केली. याबाबत आरटीआयमधून माहिती मागवली असता एसबीआयने माहिती देण्यास नकार दिला. मग कर्मचाऱ्यांना देण्यास का थांबता? बुलेट ट्रेनमधून राज्याला किती पैसा मिळणार हे सांगितलं नाही. एअर इंडियाची इमारत खरेदी करत आहेत. जाहिरातींवर 200 कोटी खर्च करण्यात येत आहेत आणि कर्मचाऱ्यांना पान पुसण्याचे काम सुरु आहे. विधिमंडळात आम्ही मुद्दा उपस्थित केल्यानंतर म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच चर्चेला बोलावणार असल्याचे सांगितले, पण चर्चेला बोलवू नका, चाॅकलेट वाटली जातील. 17 लाख लोकांचा प्रश्न असताना भूमिका का घेत नाही?"
इतर महत्वाच्या बातम्या