(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावला जाण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोगनोळी टोलनाक्यावर आक्रमक; एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड
बेळगावात (Belgaum) आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे
Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावात (Belgaum) आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. तेथून मोर्चा बेळगावला नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी आदेश काढला.
कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले होते. त्याची जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अचानक मेळाव्याला परवानगी नाकारत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे.
बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रविंद्र गाडादी म्हणाले, मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र देखील देण्यात आले. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तर काल रात्री स्टेज उभारण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आज अचानक पोलिसांनी स्टेजचे काम थांबवले असून ही आमची गळचेपी असल्याची असल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या