Kolhapur Police : एक दिवस तुमचा असेल, पण 364 दिवस आमचे; साऊंड सिस्टीम चालकांना कोल्हापूर एसपींचा सज्जड इशारा
Kolhapur Police : आगामी गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टीम चालकांनी आवाजाची मर्यादा पाळावी, असे स्पष्ट निर्देश कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत.
कोल्हापूर : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिस प्रशासनाकडून साऊंड सिस्टीम चालकांना सज्जड इशारा देण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टीम चालकांनी आवाजाची मर्यादा पाळावी, असे स्पष्ट निर्देश कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. एक दिवस तुमचा असला, तरी 364 दिवस आमचे आहेत, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
एक दिवस तुमचा असेल, पण 364 दिवस आमचे आहेत
महेंद्र पंडित बोलताना म्हणाले की, आगामी गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टीम चालकांनी आवाजाची मर्यादा पाळावी. पोलिसांशी कटुता घेऊ नका, आम्हालाही घेण्यास भाग पाडू नका. लेजरवरही बंदी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लक्षात ठेवा, आमच्याशी पंगा घेऊ नका. एक दिवस तुमचा असेल, पण 364 दिवस आमचे आहेत असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. गणेशोत्सवात वापर होणाऱ्या लेझर शोला सुद्धा बंदी असणार असल्याचे ते म्हणाले. लेजर लाईटमुळे दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अशी विचारणा त्यांनी केली. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचे साऊंड सिस्टीमचे आवाजाची पातळी तपासली जाईल, जर कायद्याचे उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल
गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस सतर्क होऊन कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करत आहे.याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल घेण्यात आले.आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे पुण्यामध्ये सापडलेल्या दहशतवाद्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्य केल्याचे सांगितले आहे. गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस सतर्क होऊन कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करत आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी दहशतवादी विरोधी पथक किती वेळात घटनास्थळी पोहचते याची चाचणी घेण्यात आली.
20 ते 25 मिनिटांत सर्व आपत्कालीन यंत्रणा पोहोचल्या
आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मॉक ड्रील करण्याच्या सूचना शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांना दिल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू असून, तातडीने घटनास्थळी हजर होण्याच्या सूचना दिल्या. 20 ते 25 मिनिटांत सर्व आपत्कालीन आणि सुरक्षा यंत्रणा सायरन वाजवत रेल्वे स्टेशनसमोर पोहोचल्या.
इतर महत्वाच्या बातम्या