कोल्हापुरकरांच्या लढ्याला यश, पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द
अदानी ग्रुपतर्फे 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केला असल्याचे कळविण्यात आले असल्याचे आबिटकर यांनी म्हंटले आहे.
कोल्हापूर : पाटगाव धरणाच्या (Patgaon Dam) पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प (Adani Green Energy Project) अखेर रद्द झाला आहे. अदानी ग्रुपने प्रकल्प रद्द केल्याचे पत्र दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Aabitkar) यांनी दिली. यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान पाटगाव धरणाच्या पाण्यावर भुदरगड तालुक्यातील 115 गावं अवलंबून आहेत.
दरगड तालुक्यातील पाटगाव मौनी सागर जलाशयातील पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पाटगाव धरणाचे पाणी या प्रकल्पाला देऊ नये यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्यात आले होते. मोर्चे तसेच ठिय्या आंदोलन सुद्धा स्थानिकांनी केले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला पाणी न देण्याचा ठराव सुद्धा करण्यात आला होता. त्यानंतर आता हा प्रकल्पच रद्द करण्यात आला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. स्वतः अदानी ग्रुपतर्फे 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प रद्द केला असल्याचे कळविण्यात आले असल्याचे आबिटकर यांनी म्हंटले आहे.
आज लोकभावनेचा विजय : प्रकाश आबिटकर
या प्रकल्पाच्या लोकांच्या भूमीका आणि कल लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे, असे पत्र अदानी ग्रुपतर्फे पाठवण्यात आला आहे. पाटगाव धरणाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब तालुक्यातील भविष्यात शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. आज लोकभावनेचा विजय झाल्याचे प्रकाश आबिटकर म्हणाले.
ग्रामस्थांच्या मागणीला यश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी देण्यास गावातील नागरिकांनी विरोध केला होता. पाटगाव धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अदानी उद्योग समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला देऊ नये, अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. पाटगाव धरणाच्या पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या कामासाठी 115 गावातील गावकरी करतात. मात्र, गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता आणि विश्वासात न घेता या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता कशी दिली? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी विरोध केला होता. राज्य सरकारने याबाबतचा आपली भूमिका केंद्राकडे मांडली. अखेर ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाले असून प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.
हे ही वाचा :