Kolhapur Crime : अवघ्या 10 गुंठे जमिनीच्या वादातून सशस्त्र हल्ल्यात चुलत भावाचा मुडदा पाडला, करवीर तालुक्यातील धक्कादायक घटना
Kolhapur Crime : मयत श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी नात्याने सख्खे चुलतभाऊ आहेत. त्यांची हालसवडेत वडिलोपार्जित शेतजमीन असून 10 गुंठे जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) करवीर तालुक्यातील हालसवडेत वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणीवरून चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. श्रीमंत पांडुरंग कांबळे (वय 51, रा. हालसवडे, ता. करवीर) असे खून झालेल्याचे भावाचे नाव आहे. पाच ते सहा जणांनी केलेल्या हल्ल्यात विनोद जनार्दन देसाई ( वय 40) आणि मृत श्रीमंत कांबळे यांचा मुलगा ऋतुराज जखमी आहे. याप्रकरणी जखमी ऋतुराज कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. श्रीमंत कांबळे यांच्या घरासमोरच खुनाची घटना घडली.
एक संशयित फरार, एक अल्पवयीन
दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी दशरथ रुद्राप्पा कांबळे फरार झाला आहे. सोबत एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.
दहा गुंठे जमिनीचा वाद न्यायालयात
मयत श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी नात्याने सख्खे चुलतभाऊ आहेत. त्यांची हालसवडेत वडिलोपार्जित शेतजमीन असून 10 गुंठे जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. गेली कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या वादात आता भावाचा बळी गेला आहे. श्रीमंत कांबळे यांचा मुलगा रोहन शनिवारी शेतात गेल्यानंतर संशयित दशरथ कांबळे यांची मुलं खासगी मोजणी करत असताना त्याने विरोध केला. तसेच तुमची जमीन मोजून घ्या आमची मोजू नका, असे सांगितले. यानंतर शनिवारी रात्रीच श्रीमंत कांबळे यांच्यावर दशरथ कांबळे आणि त्यांच्या मुलांनी सपासप वार करून खून केला.
दुसऱ्यांदा दारु पिताना बघितल्याने बेरोजगार इंजिनिअरने केला खून
दरम्यान, नशेच्या आहारी गेलेल्या बेरोजगार सिव्हील इंजिनिअरने काॅलनीमधील वृद्ध महिलेनं दारु पिताना दुसऱ्यांदा पाहिल्याने तिचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापुरात घडली. लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय 70) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी प्रतीक विनायक गुरुले (वय 24, रा. रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) याला अटक केली आहे. प्रतीकचे वडिल सरकारी नोकरीत आहेत, तर आई गृहिणी आहे. याच प्रतीकने सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेला प्रतीक गांजाबाज झाला होता. याच नशेडी प्रतीकला काही दिवसांपूर्वी मयत लक्ष्मी क्षीरसागर यांनी दारू पिताना पाहिले होते. त्यांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर प्रतीकच्या घरी वाद झाला होता. यानंतर पुन्हा प्रतीक दारू पिताना त्यांनाच दिसला. त्यामुळे त्यांनी दारू पिऊ नको, नाही तर घरी सांगेन, असे त्या वृद्ध माऊलीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि घात झाला.
इतर महत्वाच्या बातम्या