Kolhapur Crime : तरुण पत्नीकडं पाहतो म्हणून सुरा हातात घेत 'रिअल पोलिसवाला गुंडा' झालेल्या पोलिसाचं निलंबन! पोलीस पत्नीही निलंबित
कोल्हापूर पोलिस (Kolhapur Police) अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोठी कारवाई करताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. तसेच त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पोलिस पत्नीला सुद्धा निलंबित करण्यात आलं.
कोल्हापूर : पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट हातात सुरा घेवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार कोल्हापूर शहराच्या हद्दीवर असलेल्या पाचगावमध्ये घडला होता. आता या प्रकरणात कोल्हापूर पोलिस (Kolhapur Police) अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोठी कारवाई करताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. तसेच त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पोलिस पत्नीला सुद्धा निलंबित करण्यात आलं आहे. पाचगावमधील गाडगीळ कॉलनी परिसरात पोलिसच सुरा घेवून दहशत निर्माण करत असल्याने खळबळ उडाली होती.
विनोदकुमार वावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे विरोधात करवीर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. विनोदकुमार वावरे हे आपल्या आईसह गाडगीळ कॉलनी परिसरात राहतात. त्यांच्या शेजारी पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे कुंटुबियासमवेत राहतो. सोमवारी रात्री कॉन्स्टेबल आशुतोष शिंदेनं शेजारी राहत असलेले विनोदकुमार वावरे हे आपल्या पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून त्यांच्याशी वाद घातला.
यानंतर वाद मिटवण्यासाठी आलेल्या वावरे यांच्या नातेवाईकांना मारहाण करून शिवीगाळ देखील केली. रात्री उशिरा पोलीस कॉन्स्टेबल आशूतोष शिंदेनं हातात सुरा घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला होता. दरम्यान, विनोदकुमार वावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशुतोष शिंदे याच्याविरोधात करवीर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. हातात सुरा घेवून दहशत निर्माण करणाऱ्या पोलिसावर पोलीस कारवाई करतात का? अशी चर्चा रंगली होती.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
घरासमोरील तरुण पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून पोलिस कर्मचाऱ्याने (Kolhapur Police) हातात सुरा घेऊन फिरण्यास सुरूवात केली. तरूणाच्या घरासमोर आणि तो राहत असलेल्या गल्लीमध्ये हातात सुरू घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल. एवढच नाही तर तरूणाच्या घरासमोर छातीवर सुरा देखील आपटून घेत आहे. कायद्याच्या रक्षकांनी अशा प्रकारे दहशत माजवणे कितपत योग्य आहे, असा सवाल कोल्हापूरकर या घटनेनंतर विचारत होते. हा वाद झाला तेव्हा तरूणाच्या आईला चक्कर देखील आली.
इतर महत्वाच्या बातम्या