Kolhapur Crime : दुसऱ्यांदा दारु पिताना बघितल्याने बेरोजगार इंजिनिअरने कॉलनीतील म्हातारीच्या डोक्यात घातला दगड
पोलिसांनी प्रतीक विनायक गुरुले (वय 24, रा. रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) याला अटक केली आहे. प्रतीकचे वडिल सरकारी नोकरीत आहेत, तर आई गृहिणी आहे. याच प्रतीकने सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
कोल्हापूर : दारु गांजाच्या आहारी गेलेल्या बेरोजगार सिव्हील इंजिनिअरने काॅलनीमधील वृद्ध महिलेनं दारु पिताना दुसऱ्यांदा पाहिल्याने तिचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय 70) यांचा निर्घृण खून झाला होता. हा खून समोर आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये खुनाचा उलगडा झाला.
पोलिसांनी प्रतीक विनायक गुरुले (वय 24, रा. रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) याला अटक केली आहे. प्रतीकचे वडिल सरकारी नोकरीत आहेत, तर आई गृहिणी आहे. याच प्रतीकने सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे एका नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या कारनाम्याने कुटुंबावर प्रचंड मानसिक आघात झाला आहे.
अधिकाराने सांगायला गेली आणि जीव गमावून बसली
दरम्यान, पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रतीक हा इंजिनिअर असून बेरोजगार आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेला प्रतीक पुर्णत: गांजाबाज झाला होता. त्यामुळे नशेमध्येच राहत होता. याच नशेडी प्रतीकला काही दिवसांपूर्वी मयत लक्ष्मी क्षीरसागर यांनी दारू पिताना पाहिले होते. त्यांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर प्रतीकच्या घरी वाद झाला होता. यानंतर पुन्हा प्रतीक दारू पिताना त्यांनाच दिसला. त्यामुळे त्यांनी दारू पिऊ नको, नाही तर घरी सांगेन, असे त्या वृद्ध माऊलीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि घात झाला.
खून करूनही निवांतपणे वावर
पुन्हा घरी वाद होणार असा विचार करत प्रतीकने लक्ष्मी क्षीरसागर यांचा भिंतीवर ढकलून आणि डोक्यात दगड घालून खून केला. शनिवारी रात्री झालेला हा प्रकार पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शिताफीने तपास करत प्रतीकचा माग काढला. खून करूनही तो निवांतपणे वावरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसही चक्रावून गेले.
लक्ष्मी क्षीरसागर सुभाषनगरातील रोहिदास कॉलनीत राहत होत्या. घरी त्या चपला तयार करण्याचे काम करीत होत्या. शनिवारी रात्री नातीला दांडिया खेळण्यासाठी सोडायला त्या घरातून गेल्या होत्या. घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने त्यांचा शोध सुरू केला. शोध घेऊनही न सापडल्याने राजारामपुरी पोलिस स्टेशनमध्ये आई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. जवाहरनगरातील चर्चमधील दोन महिला कचरा टाकण्यासाठी आल्यानंतर भिंतीलगत वृद्धा पडलेली दिसली. त्यानंतर त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी दगड, वृद्धेचे चप्पल पडले होते.
इतर महत्वाच्या बातम्या