Kolhapur Crime : तिकडं लेकरांचा पदकांसाठी घाम निघतोय, इकडं कोल्हापुरात जिल्हा क्रीडा अधिकारी लाखाची लाच घेताना रंगेहाथ सापडला
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वर्ग एक) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला 1 लाख 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Crime) लाचखोरांची मालिका कायम असून महिला उपअभियंता लाच घेताना सापडलेली घटना ताजी असतानाच खेळाडूंच्या टाळूवरील लोणी खाणारा कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी तब्बल 1 लाख 10 हजारांची लाच घेताना जाळ्यात सापडला. जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वर्ग एक) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला 1 लाख 10 हजारांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. साखरे हा मुळचा सांगलीमधील आहे. लाच घेताना रंगेहाथ सापडल्यानंतर घरीही छापेमारी करण्यात आली. ठेकेदाराचे बिल मंजुरीपोटी 15 टक्क्यानं 1 लाख 10 हजारांची लाच घेताना कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.
डॉ. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वय 52, रा. आई निवास 156/2, फ्लॅट क्रमांक 5, राजगृह हौसिंग सोसायटी, वृंदावन व्हिला शेजारी विश्रामबाग, सांगली) येथील असल्याने पथकाकडून त्याच्या विश्रामबागमधील घराची झडती घेण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार पुण्यातील आहेत.
लाच म्हणून एक लाख 27 हजार 950 रुपयांची मागणी
ऑनलाईन महानिविदेद्वारे अॅल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवर ‘प्रिन्टशिट’ तयार करून देण्याची निविदा भरली होती. हे काम त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी अॅल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवर प्रिन्टशिट तयार करण्यासाठी सर्व साहित्याचा पुरवठा केला होता. त्याचे एकूण बिल 8 लाख 89 हजार 200 रुपये झाले. काम पूर्ण करून दोन महिने झाले तरीही बिल मंजूर करण्यासाठी टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे तक्रारदाराने शिवाजी स्टेडियममधील साखरेच्या कार्यालयात येऊन याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तक्रारदाराकडे एकूण निविदा कामाच्या 15 टक्के दराने लाच म्हणून एक लाख 27 हजार 950 रुपयांची मागणी केली होती.
लाच मागितल्याचे स्पष्ट होताच सापळा रचून कारवाई
लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी लाचखोर साखरेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाकडून पडताळणी केली असता तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सापळा रचून साक्षीदारांसमक्ष पकडून अटक करण्यात आली. ही कारवाई सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, उपनिरीक्षक संजीव बंदरगेकर, हेडकॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयूर देसाई, संदीप पवार, रुपेश माने, विष्णू गुरव यांनी केली.
लाचखोर महिला उपअभियंत्याला रंगेहाथ पकडले
दुसरीकडे, अख्खं कोल्हापूर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात मग्न असतानाच चंदगंड तालुक्यात तीन टक्क्यानं लाच मागणाऱ्या महिला उपअभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे 12 लाख रुपयांचे बिल मंजूर केलं म्हणून तीन टक्के कमिशन म्हणून 33 हजार रुपयांची मागणी चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेनं (रा. बेळगाव, हनुमान नगर, भक्तीवेस मंगल कार्यालयाजवळ, मूळ पत्ता, सी वन-506, साकेत पॅराडाईज, आधारवाडी जेल रोड, कल्याण पश्चिम जि. ठाणे) केली होती. तडजोडीअंती 25,000 रुपये लाच स्वीकारताना सुभद्राला रंगेहाथ सापळा रचून पकडण्यात आले. या प्रकरणातील तक्रारदार ठेकेदार असून त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या