Kolhapur News : जबरदस्तीने प्रेमसंबंधांसाठी प्रयत्न, तरुणाकडून तरुणीवर कोयत्याने वार, बोटे तुटली
तरुणाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणीच्या हाताची बोटे तुटली आहेत. तरुणीच्या हात, मान व डोक्यावर कोयत्याने घाव घातले आहेत. त्यामुळे तरुणीला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात तरुणींवर हल्ल्याचे प्रकार सुरुच आहेत. आता इचलकरंजीमध्ये प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर थेट कोयत्याने हल्ल्याने गंभीर जखमी झाली आहे. हल्ला करून हल्लेखोर पसार झाला आहे. तरुणाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणीच्या हाताची बोटे तुटली आहेत. तरुणीच्या हात, मान व डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहेत. त्यामुळे तरुणीला आयजीएममधून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर तरुणाचा अन्य एका मुलीशी वर्षभरापूर्वी विवाह होऊनही त्याने जबरदस्तीने प्रेमसंबंधासाठी तगादा लावला होता. तरुणीने त्याचे लग्न झाल्याने संबंध तोडले होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होता. संबंधित तरुणीने त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. तरीही जबरदस्तीने संबंधांसाठी प्रयत्न करत होता.
घरात येऊन दमदाटी
तरुणीने नकार दिल्यानंतरही तरुणाकडून घरात येऊन दादागिरी सुरु होती. गेल्या पंधरा दिवसांपासून तरुण तरुणीच्या घरी जाऊन वाद घालत होता. कालही (31 मार्च) त्याने तिच्या घरासमोर येऊन तिच्याशी वाद घालत मारहाण केली. वाद आणखी वाढल्यानंतर त्याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आरडाओरडा झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाला. तरुणीला अत्यंत जखमी अवस्थेत आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
माझ्यावर प्रेम कर अन्यथा घरच्यांना जिवंत सोडणार नाही
मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एका गावामध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला होता. धमकीचा मेसेज मोबाईलवर पाठवून नंतर संबंधित मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयीत शंतनू निगडे (वय 22) याने अल्पवयीन मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, असा मोबाईलवर मेसेज पाठवला. त्या मुलीचा पाठलागही केला होता. यानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईकांसह शालेय मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना बेदम मारहाण केली. संबंधित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड करणे, त्रास देणे, कुटुबांना धमकावणे, सोशल मीडियातून बनावट अकाउंट सुरू बदनामी करणे सुरुच आहे. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगरात एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाला कंटाळून 19 वर्षीय मुलीने चुलत्याच्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर एकाच मुलीची 12 फेक इन्स्टा अकाउंट काढून मुलीची बदनामी केल्याचे समोर आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या