IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
IND vs AUS : भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 49 धावांची खेळी केली.

होबार्ट : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. भारतानं दुसऱ्या टी 20 मॅचमधील पराभवाचा बदला घेत विजय मिळवला. भारताच्या विजयामुळं पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत पोहोचली आहे. भारताचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर यानं नाबाद 49 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार त्याला मिळाला नाही.
सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. अर्शदीप सिंगनं ट्रेविस हेड आणि जोश इंग्लिसला लवकर बाद केलं. मात्र, त्यानंतर टिम डेविडनं 38 बॉलमध्ये 74 धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिसनं 39 बॉलमध्ये 64 धावा करत संघाला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट 186 धावांपर्यंत पोहोचवलं.
IND vs AUS Player of the Match : प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला?
भारताकडून अर्शदीप सिंगनं 4 ओव्हरमध्ये 35 धावा देत 3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगनं ट्रेविस हेड, जोश इंग्लिस आणि मार्कस स्टोइनिसला बाद केलं. याशिवाय वरुण चक्रवर्तीनं 2 आणि शिवम दुबेनं 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक धावा केल्या. सुंदरनं 23 बॉलमध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं नाबाद 49 धावा केल्या आणि संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. संजू सॅमसनच्या जागी संधी मिळालेल्या जितेश शर्मानं 13 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीनं 22 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदरला साथ दिली.
अभिषेक शर्मानं 16 बॉलमध्ये 25 धावा केल्या. तर, उपकॅप्टन शुभमन गिलनं 12 बॉलमध्ये 15 धावा केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव 11 बॉलमध्ये 24 धावा केल्या. तिलक वर्मानं 26 बॉलमध्ये 29 धावा केल्या. अक्षर पटेलनं 12 बॉलमध्ये 17 धावा केल्या.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 49 धावा केल्या असल्या तरी ऑस्ट्रेलियाला 186 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्या दोन टी 20 सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवनं अर्शदीप सिंगला संधी दिली नव्हती.
टीम इंडियाचं कमबॅक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांपैकी तीन सामने पार पडले आहेत. पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. तर, दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियानं पराभव केला आहे. तिसऱ्या टी 20 मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता यापुढील दोन्ही सामने जो संघ जिंकेल तो मालिका जिंकू शकतो. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया वनडे मालिकेतील पराभवाची परतफेड करणार का हे पाहावं लागेल.





















