Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Silicon Valley Honey Trap : अमेरिकेतील बौद्धिक संपत्ती चोरण्यासाठी चीन आणि रशियाने सिलिकॉन व्हॅलीभोवतीसेक्स वॉरफेअरचं जाळं विणल्याचं टाईम्स वृत्तपत्राने म्हटलं आहे.

मुंबई : हनी ट्रॅप (Honey Trap) या शब्दाची सध्या प्रचंड दहशत आहे. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत या हनी ट्रॅपच्या विळख्यात सापडून अनेकांची फसगत होतेय. त्यात काहींना आयुष्याची पुंजी गमवावी लागतेय. या हनी ट्रॅपमुळे आता जगातील महासत्ता समजली जाणारी अमेरिकाही त्रस्त झाल्याचं चित्र आहे.
जगातल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचं हब, अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीची खाण... तसेच अॅपल, अॅमेझॉन, यूट्यूब, उबर, नेटफ्लिक्स सारख्या दिग्गज कंपन्यांची मुख्यालयं असलेलं ठिकाण म्हणजे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley). पण याच टेक्नॉलॉजी हनी ट्रॅपचा हबला विळखा पडलाय. द टाईम्सने दिलेल्या या बातमीने अख्ख्या जगात खळबळ माजली आहे.
Silicon Valley Honey Trap : मैत्री आणि लग्नाच्या माध्यमातून जवळीकता
सिलिकॉन व्हॅलीच्या हनी ट्रॅपच्या मागे मेंदू आहे तो अमेरिकेच्या दोन बलाढ्य शत्रूंचा. चीन आणि रशियानं अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातल्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी हे जाळं विणल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेच्या बौद्धिक संपदेवर रशिया आणि चीनला डल्ला मारायचा आहे. त्यासाठी हे परदेशी एजंट ऑनलाईन मैत्री करून किंवा लग्न करुन जवळीक साधतात आणि या वैयक्तिक नात्याच्या आडून व्यापारासंदर्भातील गुपितं आणि संवेदनशील डेटा हस्तगत करुन मायदेशी पाठवतात.
द टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार चिनी महिलांनी तर लिंक्डइनसारख्या अत्यंत प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. तर एका रशियन महिलेने एरोस्पेस अभियंत्याशी लग्न करुन अनेक वर्षे गुप्त माहिती हस्तगत केली. या अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी महिला एजंट्सने मुलंही जन्माला घातल्याचंही समोर आलं.
जेम्स मुलवेनॉन हे अमेरिकेच्या कंपन्यांना चीनमधील गुंतवणुकीबद्दल सल्ला देतात. त्यांनी सांगितले की, आकर्षक चिनी महिलांकडून त्यांना 'लिंक्डइन' वर मोठ्या प्रमाणात फ्रेंड रिक्वेस्ट्स येत आहेत आणि हा प्रकार अलीकडे खूप वाढला आहे.
Honey Trap : हनी ट्रॅपमागचा नेमका उद्देश काय?
- अमेरिकेचं विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नवीन संकल्पनांमधलं वर्चस्व मोडीत काढणं
- बौद्धिक संपदा चोरीतून, अमेरिकेला दरवर्षी सुमारे 600 अब्ज डॉलरचं नुकसान होतं, ज्यात बहुतांश नुकसान चीनमुळे झालं आहे.
- आर्थिक हेरगिरी: चीन अमेरिकन संरक्षण विभागाने वित्तपुरवठा केलेल्या स्टार्टअप्समध्ये गुप्त गुंतवणूक करून नव्या तंत्रज्ञानांवर नियंत्रण मिळवत आहे.
- मानसशास्त्राच्या आधारे भावनिक संबंध: हेरगिरी एजंट वैयक्तिक आकर्षण, सोशल मीडियावरील संवाद आणि भावनिक संबंधांचा वापर करून अमेरिकन कर्मचाऱ्यांकडून संवेदनशील माहिती मिळवत आहेत.
- चीन अमेरिकन संरक्षण विभागाकडून निधी मिळवणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून संवेदनशील तंत्रज्ञानावर अप्रत्यक्ष पकड मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.
एका देशातल्या महिलेने दुसऱ्या देशात जाऊन हेरगिरी करणं हे काही नवीन अस्त्र नाही. लष्करी माहिती मिळवण्यासाठी याआधीही असे हनी ट्रॅप रचले गेले आहेत. पण सध्या बौद्धिक संपत्ती चोरण्यासाठी विणलेलं हे सेक्स वॉरफेअरचं हे जाळं जास्त धोकादायक आहे.
सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेचे एक 'ओपन कल्चर' असलेले ठिकाण आहे. जिथे बाहेरच्या लोकांना सहज प्रवेश मिळतो. याच कारणामुळे या क्षेत्राला आता 'गुप्तहेरगिरीचे रणांगण' म्हटलं जातं आहे.
























