Beed Politics : बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
Pankaja Munde Vs Suresh Dhas : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. आता त्या संघर्षाने पुढचे वळण घेतल्याचं चित्र आहे.

बीड : जिल्ह्यात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) संघर्षाचा नवा अध्याय आकार घेत असल्याचं चित्र आहे. सुरेश धसांच्या आष्टी मतदार संघात आपण लक्ष घालणार अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. एवढंच नाही तर गेवराई, माजलगावात माजी खासदार प्रीतम मुंडे लक्ष घालणार असं सांगितल्याने पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्षही वाढणार आहे. या वादाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचीही किनार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात परळी विरुद्ध आष्टी, म्हणजेच मुंडे विरुद्ध धस असा जुना वाद पुन्हा उफाळून वर येत आहे. याला तात्कालीन कारण ठरल्या आहेत दिवाळी गप्पा.
Pankaja Munde Vs Suresh Dhas : आष्टीमध्ये लक्ष घालणार
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात एक वक्तव्य केलं. आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात आपण लक्ष घालणार असं पंकजाताईंनी जाहीर करुन टाकलं. पंकजा मुंडे तेवढ्यावरच थांबल्या नाहीत तर माजी खासदार प्रीतम मुंडे माजलगाव आणि गेवराईत लक्ष घालणार असल्याची घोषणाही केली. मला कुणाचीही अॅलर्जी नाही, पण विरोधकांना लक्ष्य करण्यापेक्षा आपल्याच माणसांना लक्ष्य केलं जातं असं म्हणत त्यांनी सुरेश धसांचे नाव न घेता नाराजीही व्यक्त केल्याचं दिसून आलं.
आपल्या मतदारसंघात पंकजा मुंडे लक्ष घालणार म्हटल्यावर आमदार सुरेश धस काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. सुरेश धस म्हणाले की, "पंकजा मुंडे या राज्याच्या मंत्री आहेत. त्यांना लक्ष घालायचं असेल तर त्यांनी घालावं, आमचं काहीच म्हणणं नाही."
Beed Politics : धस-मुंडेंमध्ये धुसफूस सुरूच
एकीकडे बीडचे वातावरण अनेक मुद्द्यांवरून ढवळून निघालं असताना केज, आष्टी, माजलगाव, गेवराई या मतदारसंघात लक्ष घालण्याची पंकजा मुंडेची घोषणा बीड जिल्ह्यात अस्वस्थता वाढण्यासाठी पुरेसी आहे.
तसा पंकजाताई आणि धसअण्णा यांच्यात सतत धुसफूस सुरु असतेच. विधानसभा निवडणुकीत पंकजाताईंनी आपला प्रचार केला नाही असा आरोप धसअण्णांनी केला होता. निकाल लागता क्षणी सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात उघड नाराजी बोलून दाखवली होती. आपण प्रचार केला नसता तर एवढं मताधिक्य मिळालं असतं का असं पंकजाताईंनी चार महिन्यांनी उत्तर सुद्धा दिलं होतं.
जुना संघर्ष पुन्हा उफाळणार
सन 2014 साली सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती. अलिकडच्या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरलं होतं. त्यावेळी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंविरोधात त्यांनी थेट आघाडी उघडली होती. तसंच पंकजा मुंडेंनाही त्यांनी विविध मुद्द्यांवर वेळोवेळी लक्ष्य केलं आहे. तोच धस विरुद्ध मुंडे हा जुना संघर्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार हे नक्की.
ही बातमी वाचा:


















