Samarjeetsinh Ghatge : हसन मुश्रीफ तुमचं सरकारमध्ये राजकीय वजन आहे की नाही ? अजित पवार, जयंत पाटील सांगूनही कागलला आले नाहीत
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी दोन वेळा कर कमी केले. मात्र, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कोणताच दिलासा देत नसल्याचा आरोप समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी केला.
Kolhapur : पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्य सरकारने आश्वासन देऊनही कमी केले नसल्याच्या निषेधार्थ आज कागलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले. या मोर्चात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. शहरातील गैबी चौक ते शिवाजी चौक दरम्यान हा मोर्चा पार पडला.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी दोन वेळा कर कमी केले. मात्र, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कोणताच दिलासा देत नसल्याचा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी केला. शेजारच्या कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोलचे दर आठ ते दहा रुपयांनी कमी करावेत, अशी मागणी यावेळी समरजित घाटगे यांनी केली.. यावेळी महागाईवरून समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला.
तुमचे राजकीय वजन आहे की नाही ?
मोर्चाला संबोधित करताना समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले की, अजित पवारांचा उल्लेख केला पण ते कार्यक्रमाला आले नाहीत, जयंत पाटलांचा उल्लेख केला कार्यक्रमाला आले नाहीत. मुश्रीफ तुमचे राजकीय वजन सरकारमध्ये आहे की नाही ? अशी विचारणा त्यांनी केली.
कागलपासून एक किमीवर राज्याच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 10 आणि 8 रुपये स्वस्तचे बोर्ड लागले आहेत. तुमच्या कार्यक्रमातील गाड्यांनी पेट्रोल आणि डिझेल कर्नाटकात भरले. सीमेवरील पेट्रोल पंप बंद व्हायची वेळ आली आहे. मुश्रीफांची सामान्यांशी नाळ राहिली नाही, असा हल्ला त्यांनी चढवला. पीएम मोदींनी दोनवेळा दिलास दिला, पण महाभकास आघाडीने कोणताही दिलेला नाही. धाडस असेल, तर मुश्रीफांनी दर कमी करावेत आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जोवर कमी होत नाहीत, शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान, पुरग्रस्तांना मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहोत. आपण या सरकारला गुडघ्यावर टेकवलं पाहिजे, असेही समरजितसिंह घाटगे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या