Dhananjay Mahadik : आठ वर्षांनी गुलाल लागताच धनंजय महाडिक म्हणाले, भाजपने दिलेल्या संधीची या जन्मात तरी उतराई होणार नाही
भाजपने दिलेल्या संधीची या जन्मी, तरी उतराई होणार नाही, संपूर्ण महाडिक कुटुंब स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात सांगितले.
Dhananjay Mahadik : नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानी जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदारांच्या स्वागतासाठी संपूर्ण महाडिक कुटुंबीय एकवटले होते. आठ वर्षांनी गुलाल लागलेल्या धनंजय महाडिक यांनी भाजपने दिलेल्या संधीची या जन्मी, तरी उतराई होणार नाही, अशी प्रतिक्रया दिली. संपूर्ण महाडिक कुटुंब स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय महाडिक यांनी बोलताना म्हणाले की, ही निवडणूक तशी सोपी नव्हती. राज्यसभेची उमेदवारी मिळणे खूप कठीण काम आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्षे महाडिक परिवार राजकारणामध्ये समाजकारणात कार्यरत आहे. आमचे सर्व कुटुंब, युवक असतील किंवा आमचे साहेबांचे सर्व बंधू असतील त्यांनी जे तीन चार जिल्ह्यांमध्ये वलय निर्माण केलं आणि नेटवर्क युवकांमध्ये आणि महिलांमध्ये निर्माण केलं आहे, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीने दखल घेतली असे म्हणावे लागेल आणि चंद्रकांत दादा आणि देवेंद्र फडणीस यांनी उमेदवारीची संधी आपल्याला दिली.
फडणवीसांमुळे विजय सुकर झाला
निवडणूक सोपी नव्हती, पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विजय सुखकर झाला असे म्हणावे लागेल. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने घोषित करण्यात आले होते की आमच्याकडे 272 आमदारांची संख्या आहे, त्यामुळे उमेदवार सहज निवडून येतील अशी घोषणा त्यांनी केली होती 10 ते 12 दिवसांमध्ये भाजपची सर्व टीम कार्यरत झाली आणि आपण निकाल पाहिला असेल.
भाजपने काय दिले कार्यकर्ते विचारत होते
सर्वत्र पिछेहाट होत असल्याने आणि संपूर्ण कुटूंब भाजपमध्ये असतानाही भाजपने तुम्हाला काय दिलं अशी कार्यकर्ते विचारणा हवालदिल होऊन करत होते, पण भाजपने दिलेल्या संधीची या जन्मात तरी उतराई होणार नाही, यासाठी भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो, असे ते म्हणाले.