Raju Shetti : राज्यातील सर्व पशुधनाचा 10 दिवसांमध्ये विमा उतरवा, राजू शेट्टींकडून राज्यासह केंद्र सरकारला साकडे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी 10 दिवसांमध्ये लसीकरणाचा साठा उपलब्ध करून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र व राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरविण्याची मागणी केली आहे.
![Raju Shetti : राज्यातील सर्व पशुधनाचा 10 दिवसांमध्ये विमा उतरवा, राजू शेट्टींकडून राज्यासह केंद्र सरकारला साकडे Insure all livestock in the state within 10 days, Raju ShettI request to the central government along with the state Raju Shetti : राज्यातील सर्व पशुधनाचा 10 दिवसांमध्ये विमा उतरवा, राजू शेट्टींकडून राज्यासह केंद्र सरकारला साकडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/14/ea14221474e845daf267c087eb197454166313987491688_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lumpy Skin Disease : राज्यातही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यातील पशुपालक चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या रोगाने शिरकाव केला असून हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावामधील काही जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी येत्या 10 दिवसांमध्ये लसीकरणाचा साठा उपलब्ध करून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र व राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरविण्याची मागणी केली आहे. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र सरकारकडे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन ज्याप्रमाणे कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करून दिला, त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरविण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावरे दगावल्यास संबंधित पशुपालकास होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल.
राजू शेट्टी आणखी काय म्हणाले?
गुजरात व राजस्थान या राज्यामध्ये वेळेत व योग्य उपचार न झाल्याने लम्पी या आजाराने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. या आजाराने देशी जनावरांच्या मृत होण्याची टक्केवारीचे प्रमाण जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मात्र, संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपविण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शवली जात आहे. या आजारामुळे देशात दुधाचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे. राज्य सरकारने लसीकरणास जरी सुरवात केले असली, तरी राज्यात पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांची पदे भरली नसल्याने डॅाक्टर व कर्मचारी यांची संख्या अपुरी पडत आहे.
सदर आजाराचा प्रामुख्याने देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असून महाराष्ट्रात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या असून या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे.
गोकुळ करणार मोफत लसीकरण
दरम्यान, लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जनावरांचा बाजार भरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता गोकुळनेही पशूधन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोकुळच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीचा पुरवठा करून लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)