Free Corona Booster Dose : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून मोफत कोरोना लसीचा बुस्टर डोस, घेतला नसेल, तर लगेच घेऊन टाका!
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कोरोना विरोधात बुस्टर डोस दिला जाणार आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये बुस्टर डोस घेता येणार आहे. जिल्ह्यातील 18 लाख 59 हजार नागरिकांना बुस्टर डोसचा लाभ होणार आहे.
Free Corona Booster Dose : केंद्र सरकारकडून आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव' अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस (Booster Dose) मोफत दिला जाणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बुस्टर डोस
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही आजपासून कोरोना विरोधात बुस्टर डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये बुस्टर डोस घेता येणार आहे. जिल्ह्यातील 18 लाख 59 हजार नागरिकांना बुस्टर डोसचा लाभ होणार आहे. मोहिमेला गती देण्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयामध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डोस पोहोच करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण?
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 124 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 34 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये कोल्हापूर शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
बूस्टर डोस म्हणजे काय?
सामान्यतः लसीचा एक किंवा दोन असे प्राथमिक डोस दिले जातात. लसीच्या प्राथमिक डोसनंतर दिल्या जाणाऱ्या डोसला बूस्टर डोस असं म्हटलं जातं. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोस दिला जातो.
कोण घेऊ शकतं बूस्टर डोस?
18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकते. याआधी बूस्टर डोस फक्त वयोवृद्धांसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये सरकारनं मोठा निर्णय घेत बूस्टर डोस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस घेता येणार असल्याचं जाहीर केलं. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी बूस्टर डोसचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.
लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर किती?
आरोग्य मंत्रालयां कोरोनाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यातील अंतर 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. यासोबतच केंद्र सरकारनं प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करण्यासाठी 1 जूनपासून 'हर घर दस्तक' मोहीम 2.0 सुरु केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या पहिल्या दोन डोसचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
कधी घ्यावा बूस्टर डोस?
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.
बूस्टर डोससाठी किती पैसे मोजावे लागणार?
कोरोनाचा बूस्टर डोस फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात कोणी बूस्टर डोस घेतल्यास त्यासाठी त्यांना शुल्क भरावं लागणार आहे. खाजगी केंद्रांवर, कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. याशिवाय रुग्णालय स्वतंत्रपणे सेवा शुल्क देखील आकारू शकतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या निवडणुकीला स्थगिती
- Vishalgad Fort Landslide : कोल्हापूर जिल्ह्यात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांची दुरावस्था सुरुच, आता विशाळगडावरील बुरुज कोसळला
- Panhala Fort Landslide : पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
- Raju Shetti : "शेतकऱ्यांना 9 ऑगस्टच्या आत 50 हजार मिळाले नाही, तर क्रांती दिनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन"