(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray in Kolhapur : माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरकेंना काय करायचं सुचेना, सुजित मिणचेकरांचे तळ्यात मळ्यात सुरुच!
Aaditya Thackeray in Kolhapur : माजी आमदार चंद्रदीप नरके हे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. त्याचबरोबर माजी आमदार सुजित मिणचेकर यांची मात्र अजूनही तळ्यात-मळ्यात अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे.
Aaditya Thackeray in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेला भगदाड पडले आहे. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने शिंदे कळपात सामील झाले आहेत.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगलेच भगदाड पडले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याची जबाबदारी माजी शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. काल त्यांचे यात्रेचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले.
आजऱ्यामध्ये प्रथम आगमन झाल्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. त्यानंतर त्यांची कोल्हापूरमध्येही मिरजकर तिकटीला सभा पार पडली. या सभेला पाऊस असतानाही त्यांनी शिवसैनिकांमध्ये मिसळून भाषण करत एक नवीन नवीन उमेद देण्याचा प्रयत्न केला.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी शिवसेना आमदारांची भूमिका काय? याची चर्चा शिवसैनिकांमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये रंगली आहे.
करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. काल आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर माजी आमदार सुजित मिणचेकर यांची मात्र अजूनही तळ्यात-मळ्यात अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या घरी सुजित मिणचेकर उपस्थित राहिले होते.
त्यामुळे सुजित मिणचेकर हे शिंदे गटात जाणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्येही सुजित मिणचेकर दिसून आल्याने ते अजूनही द्विधा मनस्थितती असल्याचे दिसून येत आहे. काल कोल्हापूर शहरात झालेल्या सभेला सुजित मिणचेकर हे उशिरा पोहोचल्यानंतर स्टेजवरच कुजबुज पसरली होती. मात्र, आज दुसऱ्या दिवशी जयसिंगपूरमध्ये सुजित मिणचेकर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोहोचल्याने त्यांची अजूनही अवस्था तळ्यात-मळ्यात अशा स्वरूपाचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे आमदार सत्यजित पाटील सरूडकर मात्र हे या दौऱ्यामध्ये पूर्णपणे सक्रिय असल्याचे दिसून आले. माजी आमदार सुरेश साळोखे हे सुद्धा काल व्यासपीठावर ती दिसून आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन आमदारांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र,चंद्रदीप नरके आणि मिणचेकर यांची मात्र अजूनही द्विधा मन:स्थिती असल्याचे समोर येत आहे.