Comrade Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिजागर 16 फेब्रुवारीपासून; दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार
गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या खुनामागील मास्टरमाईंड जाहीर करून त्यांना पकडावे, धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुरोगामी पक्षांसह संघटनांनी केली आहे
Comrade Govind Pansare : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या खुनामागील मास्टरमाईंड जाहीर करून त्यांना पकडावे, धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुरोगामी पक्षांसह संघटनांनी केली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 16 फेब्रुवारीपासून मोर्चा, सभांच्या माध्यमातून पानसरे स्मृतिजागर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसईबी वर्कर्स फेडरेशन ऑफिसच्या कार्यालयात बैठक पार पडली.
माकपचे राज्य सचिव उदय नारकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले, लालनिशाणचे अतुल दिघे, शेकापचे बाबुराव कदम यांनी पानसरे स्मृतिजागरबाबत विचार मांडले. त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून स्मृतिजागर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारीला इचलकरंजी, गारगोटीमध्ये 18 तर गडिंग्लजमध्ये 19 फेब्रुवारीला स्मृती जागरसभा होईल. 20 तारखेला मॉर्निंग वाॅक, सायंकाळी पाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मृतिदिनी राज्यभरात मोर्चे काढण्यात येणार आहेत. (Comrade Govind Pansare)
20 फेब्रुवारीला देशभरात मागणी दिवस पाळून आंदोलने केली जाणार आहे त्याची माहिती भाकप जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे आणि शहर सचिव रघुनाथ कांबळे यांनी दिली. यावेळी श्रमिक प्रतिष्ठानच्या डॉक्टर मेघा पानसरेही उपस्थित होत्या.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण;10 संशयितांवर आरोप निश्चिती
दरम्यान,कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या हत्येचा कट आणि हत्या प्रकरणात 10 संशयितांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) कोल्हापूर सत्र न्यायालयाला (Kolhapur Session Court) दिल्यानंतर आजपासून सुनावणीला प्रारंभ झाला. 10 संशयितांमध्ये समीर गायकवाड, वीरेंद्र सिंह तावडेसह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्याने पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होईल.
पानसरे कुटुबीयांनी केलेल्या मागणीनंतर काही महिन्यांपूर्वीच हा तपास एसआयटीकडून (SIT) एटीएसकडे (ATS) देण्यात आला आहे. तेव्हा तातडीनं यामध्ये नवी माहिती समोर येणं कठीण असल्याने एसआयटीनं तयार केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर उभ्या राहिलेल्या खटल्याची कारवाई सुरू करा, असे निर्देश हायकोर्टानं जारी केले होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्येनंतर एसआयटीने तपास करून 12 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. एटीएसकडूनही तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या