जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार; कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्र्यांना निवेदन
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उर्मट वर्तनाने संतप्त झालेल्या कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देत जिल्हाधिकाऱ्यांना यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
![जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार; कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्र्यांना निवेदन Collector Rahul Rekhawar Be warned over his attitude statement from the Kolhapur Press Club to the Guardian Minister deepak kesarkar जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार; कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्र्यांना निवेदन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/08089d20fc5aa8b81bab21b3345f70b3166471454974488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur News : नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाई मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांची लाज काढली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनाने संतप्त झालेल्या कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरच्या पत्रकारांकडून नेहमीच पुरोगामित्व जपताना विकासकामांना प्रोत्साहन दिलं आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पत्रकार यांच्या समन्वयातून अनेक चांगली कामं कोल्हापूर जिल्ह्याने करून दाखवली आहेत. असे असतानाही मनमानी कारभार आणि पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबने जिल्हाधिकारी रेखावार यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना समज न दिल्यास प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कोल्हापूर प्रेस क्लबने निवेदनातून दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी पत्रकारांचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात, पण गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे प्रशासन आणि पत्रकारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अंबाबाई मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमाबाबत काही पत्रकारांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना विचारणा केली. त्यावर योग्य स्पष्टीकरण देण्याचे सोडून रेखावार यांनी कोल्हापूरच्या पत्रकारांचीच लाज काढण्याचे काम केले. कोल्हापूरचे पत्रकार विकासकामांधील अडथळे आहेत, स्वस्त मानसिकतेचे आहेत, अशा शब्दात पत्रकारांचा अपमान केला. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, प्रसंगी काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करू असा इशाराही कोल्हापूर प्रेस क्लबकडून देण्यात आला.
अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात रेखावार यांच्याकडून पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफरना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या दौऱ्यांमध्येही रेखावार यांच्याकडून योग्य नियोजन केले जात नाही. पत्रकार आणि मंत्रीमहोदय एकत्र येऊ नयेत, अशीच त्यांची भूमिका दिसते, असेही निवेदनात म्हटले आहे.
रेखावार यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार नसेल तर, आम्ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. तसेच प्रशासकीय बातम्यांवर बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. करी कृपया कोल्हापूरचे पालकमंत्री या नात्याने आपण संबंधित प्रकाराची गांभिर्याने दखल घेऊन, जिल्हाधिकारी रेखावार यांना समज द्यावी. असे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे.
यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मिस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर यांच्यासह प्रेस क्लबचे सहकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)