शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की रस्ते विकासामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यामुळेच तुमच्या मागणीवरून विकासाचा शक्तिपीठ मार्ग चंदगडमधून वळवला आहे.

Shaktipeeth Expressway: जनतेच्या समर्थनामुळे शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून वळवला असून कोणत्याही परिस्थितीत तो मार्गी लागणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शक्तिपीठ महामार्गाला हात घालत शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करणार असल्याचे सुतोवाच केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की रस्ते विकासामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यामुळेच तुमच्या मागणीवरून विकासाचा शक्तिपीठ मार्ग चंदगडमधून वळवला आहे. या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क, एमआयडीसी देऊन उद्योग उभारणार आहोत. तसेच आमदार शिवाजी पाटील यांच्या संकल्पनेतील पर्यटन हब तयार करण्यासाठी प्रयत्न करू, असेही फडणवीस यांनी यांनी सांगितले.
भाजपाच्या साथीने कोल्हापूरच्या प्रगतीला गती...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2025
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडच्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपा उमेदवार सुनिल काणेकर आणि मित्रपक्षाच्यावतीने आजरा नगर पंचायत नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार अशोक चराटी आणि गडहिंग्लज नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर… https://t.co/ATe3idwo0J pic.twitter.com/ZftGRKzZ2H
शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीकडून निषेध
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ होणार असं म्हटल्यानंतर शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीकडून याचा निषेध करण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलन सुरू करतील, असा इशारा संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. पत्रकात म्हटलं आहे की, 12 जिल्ह्यासह शिरोळ, हातकलंगले, कागल, तालुक्यातील लोकांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. रस्त्यांसाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून लावलं आहे. शेतकरी छातीचा कोट करून विरोध करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होणार नाही, सरकार केवळ कंत्राटदारांचे भलं करण्यासाठी महामार्ग होणार असल्याचे सांगत आहे, पण महामार्ग कशासाठी हवा याचे उत्तर सरकारने दिलेलं नाही. गेल्या चार महिन्यात एकाही गावात संयुक्त मोजणी होऊ दिलेली नाही, तरी सरकार शक्तिपीठ रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे पत्रकात म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























