Amit Shah In Kolhapur : अमित शाहांनी कोल्हापुरात शड्डू ठोकला; चंद्रकांत पाटलांनी लगेच खुलासा केला, पण शिंदे गटातील दोन खासदारांचे काय?
बहुचर्चित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah In kolhapur) यांचा कोल्हापूर दौरा झाला. या दौऱ्यातील विजय संकल्प रॅलीत भाजपला 48 जागांवर विजय आवश्यक असल्याचे प्रतिपादन शाहांनी केले.
Amit Shah In Kolhapur : बहुचर्चित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah In kolhapur) यांचा कोल्हापूर (Kolhapur News) दौरा रविवारी झाला. या दौऱ्यातील विजय संकल्प रॅलीत भाजपला 48 जागांवर विजय आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मात्र, अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेनंतर शिंदे गटाच्या पोटात नक्कीच गोळा आला असणार आहे. अमित शाह यांनी सर्वच जागांवर दावा केला आहे, तर शिंदे गटाला काय मिळणार? आणि मिळालं तरी नेमकं काय मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपचा (BJP) एकही आमदार आणि खासदार नसल्याने त्यांची सल त्यांना कायम आहे. दुसरीकडे शिंदे गटाची कोल्हापुरात मोठी ताकद आहे. दोन खासदार, दोन माजी आमदार आणि एक विद्यमान आमदार शिंदे गटात आहेत. मात्र, यामधील सर्वाधिक गोची संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची झाली आहे. देशातील विरोधी पक्षांमध्ये नेत्यांमध्ये अजूनही एक वाक्यता नसली तरी भाजपकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी केव्हाच रणशिंग फुंकण्यात आलं आहे.
कोल्हापूरवर भाजपकडून लक्ष केंद्रित
भाजपची ज्या ठिकाणी बाजू कमकुवत आहे त्या ठिकाणी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत 170 मतदारसंघांमध्ये भाजपकडून संपर्क सातत्याने वाढवण्यात आला आहे. केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे, जनसंपर्क वाढवणे या माध्यमातून कार्य केले जात आहे. यामध्ये कोल्हापूरच्या दोन जागांचा समावेश आहे. कोल्हापुरात एका महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे, नितीन गडकरी आणि थेट अमित शाह यांचा दौरा झाला आहे. त्यामुळे भाजपच्या तयारीचा अंदाज येतो. तीन आठवड्यात दोन भाजपचे मेळावे झाल्याने कार्यकर्तेही जोमात आहेत. नितीन गडकरींच्या कार्यक्रमातही मंडलिक आणि माने व्यासपीठावर होते. त्यामुळे शाह यांनी केलेल्या गर्जेनेनंतर या दोन खासदारांचे नेमके काय होणार? हा प्रश्न सातत्याने स्थानिक वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे. याचं कारण म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटांमध्ये असले, तरी त्यांची 2024 मध्ये स्थिती काय असेल याबाबत कोणतीही अजूनही स्पष्ट भूमिका झालेली नाही.
शिंदे गटाला चिन्ह मिळूनही साशंकता कायम
गेल्या काही दिवसांपासून चिन्हाची लढाई शिंदे गटाकडून सुरू होती. मात्र, आता त्याच्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानुसार शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. मात्र, हे मिळून सुद्धा हे दोन्ही खासदार शिवसेना चिन्ह आणि शिवसेना नावावरून लढतील की नाही? याबाबत आज तरी कोणतीही स्पष्टता नाही शाह यांनी सर्व 48 जागांवर विजय मिळण्याचे आवाहन केले. त्यामुळे शिंदे गटाला 2024 च्या निवडणुकीमध्ये नेमक्या जागा मिळणार तरी किती? आणि ते मिळाल्या तर कोणत्या असणार याबाबत बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाजपकडून तयारी करण्यात आलेल्या जागांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा खासदार असलेल्या जागेचाही त्यामध्ये समावेश आहे. रविवारी (19 फेब्रुवारी) भाजपच्या व्यासपीठावर खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे लगेचच खुलासा देण्याची वेळ उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आली. त्यांनी सांगितले की, व्यासपीठावर संजय मंडलिक आणि धैर्यशील माने असल्याने उपस्थितिदांचा गैरसमज झाला, तरी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सध्या भाजप बरोबर आहे. शाह यांनी राज्यातील लोकसभेचे 48 मतदारसंघ भाजप जिंकणार असे सांगितले. यावरून कोल्हापुरातील शिवसेनेच्या दोन खासदारांची निवडणुकीत कोंडी होणार? की शिवसेनेला या जागा सोडल्या जाणार किंवा या दोघांना भाजपची उमेदवारी देऊन त्यांचा मार्ग प्रशस्त केला जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आजवरची भाजपची वाटचाल पाहता जमीन पोषक करून या दोन खासदारांना शिवसेनेकडून लढण्यास सांगितलं जाईल का? याबाबत निश्चितच साशंकता आहे. त्यामुळे या दोन्ही खासदारांना शिंदे गटाऐवजी भाजपकडूनच लढवण्यास परावृत्त केलं जाईल, अशीच चिन्हे एकंदरीत दिसत आहेत.
अमित शाह काय म्हणाले?
अमित शाह कोल्हापुरातील रॅलीत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात देशाला प्रगतीपथावरून नेलं आहे. आपल्याला आता महान भारताची रचना करायची आहे, त्यासाठी 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला नुसते बहुमत नको तर लोकसभेच्या सर्व 48 जागांवर विजय आवश्यक आहे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. 2014 नंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या 11 व्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणले. सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून दहशतवादाला सडेतर उत्तर दिले, 370 कलम रद्द केले, आयोजित राम मंदिर साकारले जात आहे. आता आपल्याला महान भारताची रचना करायची आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विजय आवश्यक आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :