Manoj Jarange Protest : आंतरवाली सराटीसह जालन्यात सध्या काय परिस्थिती?, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
Manoj Jarange Protest : जालना अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आंतरवाली सराटीसह जालन्यात सध्या काय परिस्थिती आहे याबाबत 'एबीपी माझा'ला माहिती दिली आहे.
जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, परत एकदा आंतरवाली सराटीसह (Antarwali Sarathi) जालना (Jalna) जिल्हा याचा केंद्रबिंदू बनला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. सध्या आंतरवाली सराटीसह जालना जिल्ह्यात सर्वत्र महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जालना अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आंतरवाली सराटीसह जालन्यात सध्या काय परिस्थिती आहे याबाबत 'एबीपी माझा'ला माहिती दिली आहे.
मराठा आंदोलनाबाबत माहिती देतांना अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले की, "अंबड तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कलम 144 नुसार संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे. खबरदारी म्हणून रात्री काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या सोबत देखील आमचं बोलणं झालं आहे. तसेच संचारबंदीच्या आदेशानंतर मुंबईकडे जाण्याचा निर्णय त्यांनी रद्द केल्याची माहिती दिली आहे. मनोज जरांगे यांना उपचार घेण्याबाबत देखील विनंती केली आहे, त्यानुसार ते निर्णय घेणार असल्याचे नोपानी म्हणाले.
काही ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे
पुढे बोलतांना नोपानी म्हणाले की, "मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. जालना जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली असल्याने या भागातील काही ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संचारबंदी लागू असल्याने कोणीही या ठिकाणी येऊ नये असे आवाहन आम्ही पोलिसांतर्फे करत आहोत. गरजेचं काम असेल तर घराबाहेर निघू शकता, फक्त अंबड तालुक्यासाठी हा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील," नोपानी म्हणाले.
मनोज जरांगेंनी आंदोलकांना घरी परत पाठवले...
मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आंतरवाली सराटीत दाखल झाले होते. मनोज जरांगे मुंबईकडे निघाल्यावर हे आंदोलक देखील त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, संचारबंदीचा आदेश निघाल्याने जरांगे पुन्हा आंतरवालीत परतले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आंतरवालीत आलेल्या लोकांना त्यांनी घरी परत पाठवले आहेत. संचारबंदी असल्याने सर्वांनी आपल्या घरी परत जावे आणि संचारबंदी उठल्यावर परत यावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :