Jalna: फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यात निघणार 'जल आक्रोश मोर्चा'
Jalna Water Issues: पाणी प्रश्नाबरोबरच देवेंद्र फडणवीस जालन्यातील विकासकामांच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता.
Jalna Water Issues: औरंगाबादनंतर आता जालन्यातील पाणी प्रश्न तापणार असल्याचे चित्र आहे. कारण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही वेळात जालना शहरात 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. शहराचा रखडलेला विकास आणि पाणीपश्न यासह अन्य मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याची माहिती भाजप आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे. 11 वाजेच्या दरम्यान या मोर्च्याला सुरवात होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून जालना शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी प्रश्नावरून सर्वसामन्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादप्रमाणेच जालना शहरात बुधवारी सकाळी 11 वाजता मामा चौक ते गांधी चमन येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार असून, यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे.
फडणवीस काय बोलणार...
जालना शहरात आज भाजपकडून काढण्यात येणाऱ्या जल आक्रोश मोर्च्यात फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे सरकारवर निशाणा साधतान फडणवीस पाण्यासोबतच आणखी कोणत्या मुद्यावरून बाण सोडणार याची सुद्धा चर्चा आंदोलनास्थळी पाहायला मिळत आहे. सोबतच आगामी स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि काँग्रेसवर सुद्धा फडणवीस टीका करू शकतात, असेही बोलले जात आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात येणाऱ्या मोर्च्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा खबरदारी म्हणून मोर्च्यास्थळी मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. शहरातील मामा चौक ते गांधी चमनपर्यंत पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. सोबतच मोर्च्याच्या ठिकाणी साध्या वेशात सुद्धा विशेष पोलीस तैनात असणार आहे.