घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Raigad crime: पोलिसांनी तपासाची सूत्रं हातात घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांतच आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं.

Raigad Crime: म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडलं असून, हे प्रकरण थेट कौटुंबिक वैरातून उभं राहिल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वृद्ध दांपत्याची हत्या कुणी परका नाही, तर त्यांच्या स्वतःच्या दोन मुलांनीच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. (Crime news) आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, घरात राहू देत नाहीत याच्या रागातून दोन्ही मुलांनी आपल्याच आईवडिलांचा काटा काढल्याचा प्रकार समोर आलाय.
मृतांची नावे महादेव कांबळे (वय 70) आणि विठाबाई कांबळे (वय 65) अशी असून, दोघांचे मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू की आत्महत्या, याबद्दल संशय होता. मात्र म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने केलेल्या तपासात या मृत्यूमागे खुनाचा सुगावा लागला. पोलिसांनी तपासाची सूत्रं हातात घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांतच आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं.
आई वडिलांचा काटा काढला
या प्रकरणात पोलिसांनी महादेव कांबळे यांचे दोन मुलगे नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईवडील घरखर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत, या कारणावरून दोन्ही मुलांना आपल्या आईवडिलांबद्दल राग होता. या रागाच्या भरात त्यांनी आईवडिलांचा काटा काढण्याचा थरारक निर्णय घेतला. घटनेच्या रात्री दोन्ही मुलांनी घरात प्रवेश करून आईवडिलांवर हल्ला चढवला. दोघांना ठार मारल्यानंतर त्यांनी मृतदेह घरातच ठेवून पळ काढला. दोन दिवसांनंतर शेजाऱ्यांना कुजलेल्या वासाने संशय आला आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर या घटनेचा भयानक उलगडा झाला.
या घटनेने संपूर्ण म्हसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पोटच्या पोरांनीच आईवडिलांचा खून केल्याच्या घटनेमुळे नागरिक स्तब्ध झाले आहेत. गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. म्हसळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


















