पाकिस्तानच्या भूमिगत अणवस्त्र चाचणीमुळं भूकंप येतात, आता अमेरिकेला देखील अणवस्त्र चाचणी करावी लागेल : डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून भूमिगत अणवस्त्र चाचण्या केल्या जात असल्यानं भूंकप येत असल्याचा दावा केला आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अमेरिकन वाहिनीवर बोलताना पाकिस्तानकडून भूमिगत अणवस्त्र चाचण्या केल्या जात असल्याचं म्हटलं. रशिया आणि चीन सारखे देश देखील अणवस्त्र चाचण्या करत आहेत. भूमिगत अणवस्त्र चाचण्या होत असल्यानं भूकंप येत असल्याचं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सीबीएस न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की रशिया आणि चीन अणवस्त्र चाचण्या करत आहेत, मात्र ते याबाबत बोलत नाहीत. आपला एक खुला समाज आहे, आपण त्याबाबत चर्चा करतो. आपल्याला याबाबत चर्चा करावीच लागेल, असं ट्रम्प म्हणाले.
Donald Trump on Nuclear Test : ट्रम्प अणवस्त्र चाचणी बाबत काय म्हणाले?
ट्रम्प यांनी पुढं म्हटलं की आम्ही अणवस्त्र चाचण्या करणार कारण ते चाचण्या करतात. निश्चितपणे उत्तर कोरिया चाचण्या करत आहे. पाकिस्तान देखील अणवस्त्र चाचण्या करतोय, असं ट्रम्प म्हणाले.
रशियानं काही दिवसांपूर्वी पोसाइडन अंडरवॉटर ड्रोन आणि अणवस्त्रांची चाचणी केल्याबद्दल ट्रम्प यांना विचारण्यात आलं. तेव्हा ट्रम्प यांनी म्हटलं की तुम्ही पाहिलं असेल ते कसं काम करतात. मी चाचणी यासाठी म्हणतोय रशियानं ते चाचणी करणार आहेत.सातत्यानं उत्तर कोरिया अणवस्त्र चाचणी करत आहे. दुसरे देश देखील चाचण्या करत आहेत. आपला एकमेव देश आहे जो चाचणी करत नाही. मात्र, मला असा एकमेव देश बनायचं नाही जो अणवस्त्र चाचण्या करत नाही, अं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेकडे जगाला 150 वेळा बेचिराख करण्याइतकी अणवस्त्र
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की ते दुसऱ्या देशांप्रमाणं अणवस्त्रांची चाचणी करतील. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार अमेरिकेकडे सर्वाधिक अणवस्त्र आहेत. जगाला 150 वेळा उडवण्यापुरती अणवस्त्र आमच्याकडे असल्याचा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. रशियाकडे खूप अणवस्त्र आहेत, चीनकडे अधिक अणवस्त्र आहेत, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अणवस्त्रांची चाचणी पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली होती. अमेरिका तीन दशकांनंतर पुन्हा अणवस्त्र चाचणी सुरु करत आहे. रशिया आणि चीनचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले सर्वजण अणवस्त्र चाचणी करत आहेत.

















