(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गावात लम्पीचा प्रादुर्भाव; अधिकाऱ्यांनी मात्र फिरवली पाठ, संतप्त शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र
Jalna News : गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव, अधिकाऱ्यांनी मात्र गावाकडे फिरवली पाठ, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले रक्ताने लिहिलेले पत्र
Jalna News : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणाऱ्या लम्पी आजारावर (Lumpy Skin Disease) सरकारने (Maharashtra Government) नियंत्रण मिळवले असून, परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा सतत प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात गावपातळीवर परिस्थिती उलट असल्याचे चित्र जालना येथील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील घटनेवरून समोर आले आहे. एकट्या रोषणगाव येथे लम्पी संसर्गजन्य (Lumpy Disease) आजारामुळे 11 ऑक्टोबरपर्यंत 16 जनावरे दगावली आहे. जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या गावाकडे पाठ फिरवत बहिष्कार टाकला असल्याचा आरोप करत, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवून मदतीची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजार आढळून येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात 50 जनावरांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जनावरे एकट्या रोषणगावातील असल्याचा दावा कृष्णा खरात यांनी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या रक्ताच्या पत्राद्वारे केला आहे. तर रोषणगावात गावात एकूण 749 जनावरे आहेत. सध्या 201 जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत, तर सोळा जनावरे दगावली आहेत.
अधिकारी गावाकडे फिरकतच नाही...
लम्पी बाधित जनावरांच्या मृत्यूमुळे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांजवळ भावना मांडण्याचा प्रयत्न केला, तर या भावनांना अरेरावीचे स्वरूप देऊन गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाने दीड महिन्यापासून रोषणगाव ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे .त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून मायबाप सरकारने ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी गावातील तरूण शेतकरी कृष्णा एकनाथ खरात यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने गावावर बहिष्कार....
गावातील परिस्थितीबाबत अनेकदा गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगितले, मात्र ते महिनाभर गावात आलेच नाही. याबाबत त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली असता, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी संघटनांनी गावावर बहिष्कार टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहलेल्या पत्रात केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचं गावकऱ्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या...
चिंताजनक! लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण; शेतकऱ्यांसमोर नवं संकट
काय सांगता! लम्पीच्या अनुषंगाने गोठ्यातील स्वच्छता, धूर फवारणी जनजागृतीची जबाबदारी आता शिक्षकांवर