(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अकोलेत दाखल झाली. अजित पवारांनी अकोले विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
अकोले : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. तर नेत्यांकडून विधासभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा आणि मेळावे सुरु आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा (jansanman Yatra) अकोलेत दाखल झाली. अकोले येथील सभेत बोलताना अजित पवारांनी थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
अजित पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षातील तीनच वर्ष मला काम करायला मिळाले. या तीन वर्षात तुमच्या बहाद्दर आमदाराने (किरण लहामटे) माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला. आधीचे दोन वर्षे मिळाली असती तर अधिक काम करता आलं असतं. तिजोरीचा भार पाहून मला कामे करावे लागतात.
डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
विधानसभा काही निवडणुकीसाठी ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपचे चिन्ह असेल. ही सर्व महायुतीचे चिन्ह आहेत. तुमच्या मतदारसंघात घड्याळ हे चिन्ह असेल, असे म्हणत अजित पवारांनी विद्यमान आमदार किरण लहामटे यांची अकोले विधानसभा मतदारसंघांतून (Akole Assembly Constituency) उमेदवारी जाहीर केली.
अकोल्यात घड्याळाच बटन दाबावं लागेल
अजित पवार पुढे म्हणाले की, जन सन्मान यात्रा निघाल्यापासून मी कोणावर टीका करत नाही. आम्ही केलेली विकास काम जनतेला सांगतोय. त्यामुळे अकोल्यात घड्याळाच बटन दाबावं लागेल. तुम्ही फक्त तेवढं काम करा. त्यानंतर तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम आमचं आहे. आम्ही एकदा बहुमताजवळ गेलो की सरकार आलंच. केंद्रात जाऊन सरकार आणलं मदत करा हे सांगू. मी शेतकऱ्यांच्या संस्थांना मदत करणारा शेतकऱ्यांचा सुपुत्र आहे. अकोले साखर कारखान्याची अडचण केंद्रात जाऊन सोडवली. आहे ना आमच्यात धमक. कशाला दुसऱ्यांकडे जायचं. लोकसभेला विरोधकांनी दिशाभूल केली. आमच्याबद्दल खोटा प्रचार केला त्याची किंमत आम्हाला मोजवी लागली.
राखीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही
केवळ अर्धा टक्का मत कमी पडली. पण, जागा किती गेल्या याचा विचार करा. लाडकी बहीण योजना जात बघून आणली का? सगळ्यांना त्याचा फायदा होतोय. तुम्हाला मी कधीही अडचणीत येऊ दिले नाही. माय माऊलींनो तुमचे आशीर्वाद मला पाहिजेच. राखीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज आणि लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार फक्त सरकार आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. तर इकडून तिकडं करून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याची धमक माझ्यात आहे. बोलण्यात दम लागतो. आत्ता पोलिसांना सांगितलं महिलांना जागा द्या दिली की नाही, असे म्हणत अजित पवार यांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर टीका केली.
आणखी वाचा