Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'जो कोणी असेल त्याच्यावर...'
Rupali Chakankar on Raksha Khadse: कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Raksha Khadse : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या टवाळखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केली आहे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावाची यात्रा बघण्यासाठी गेले होते. यावेळी काही तरुण त्यांच्या परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही तरुणांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जो कोणी असेल त्याच्यावर...
या प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, मी स्वतः स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. टवाळखोरावर या आधीही गुन्हे दाखल आहेत, आता ही कारवाई होती आहे. गरजेच्या ठिकाणी अशा घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही, बीट मार्शल असं असताना सुद्धा अशा घटना घडत आहेत. जो कोणी असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल. जे कृत्य केला आहे ते लाजिरवाणं आहे. माणसांच्या कळपातील ही विकृती आहे यांचां चेहरा झाकण्यापेक्षा ते चेहरे समाजाला दाखवणे गरजेचे आहे. किती निर्लज्ज लोक आहेत हे माणसांना समजू दे. गृह विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्य महिला आयोग असतील त्या भागातील पोलीस देखील याच्याबाबत निश्चितपणे तत्परता दाखवतील आणि असांवक कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
स्वारगेट प्रकरणांमध्ये पोलिसांनी तत्परता दाखवली आहे. अशा घटनांमध्ये मीडिया ट्रायल न करता खाकी वर्दीवर कोणत्याही प्रकारचं डाग न टाकता ते जे कारवाई करतील त्याला मदत करावी. स्वारगेट प्रकरणांमध्ये न्यायदेवता योग्य निर्णय देईल, अजून वेळ आहे. आताच कोणताही निष्कर्ष काढायला नको, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. रूपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत केलेल्या प्रश्नावर बोलताना चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाची गरिमा खूप मोठी आहे, कोणी काय बोलतात त्याच्यावर उत्तर देणं योग्य वाटत नाही. त्यांनाच तुम्ही प्रश्नांचे उत्तर विचारा. अनेक कठोर कायदे केले आहेत. मात्र, लोकांची मानसिकता नाही की त्याचं पालन केलं जात नाही, असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.
प्रकरण नेमकं काय?
आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते. या दिवशी विविध कार्यक्रम असतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या ही येथे फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता, त्यानंतर रक्षा खडसे यांच्या कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली. यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला. व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु त्याने सुरक्षारक्षकाशी झटापट केली.























