Jalgaon News : 'अवकाळीने सारं काही हिरावून नेलं', अनिल पाटलांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
Jalgaon Unseasonal Rain जळगाव : गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपिटीने थैमान घातले आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
पारोळा तालुक्यातील हिवरखेडे, मोंढाळे, करंजी, पिंपळभैरव, बहादरपुर, शिरसोदे, शेवगे बु., महाळपुर, कंकराज, भिलाली, कोळपिंप्री, रत्नापिंप्री, शेळावे खु., शेळावे बु. या गावांना अनिल पाटील यांनी भेट दिली. त्या शिवाय अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, ढेकु, हेडावे येथील शेतात फळबागेत जाऊन नुकसानीची पाहणी त्यांनी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे आपल्या व्यथा मांडत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत आणि त्यांचे सांत्वन करत, लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. संभाजीराजे पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, अमळनेर पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, पारोळा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय दामले यांच्यासह महसूल, कृषी, वीजमंडळ, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
धुळ्यातही शेतीचं मोठं नुकसान
धुळे जिल्ह्यात (Dhule News) देखील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेले पीक देखील हिरावलं गेले आहे. गहू, बाजरी, लिंबू व टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पुढील 24 तासात पावसाचा अंदाज
राज्यासह देशात विविध ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यासोबतच काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आणखी वाचा