(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mulayam Singh Yadav Health : मुलायम सिंह यादव सीआरआरटी थेरपी सपोर्टवर, किडनी फेल झाल्याची डॉक्टरांची माहिती
Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव सीआरआरटी थेरपी सपोर्टवर आहेत. त्यांची किडनी फेल झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.
Mulayam Singh Yadav Health : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलायम सिंह यादव यांची किडनी निकामी झाल्याने ते रेनल रिप्लेसमेंट थेरपी (CRRT) सपोर्टवर आहेत. त्यांच्या शरीरातील क्रिएटिनची पातळी असतत अनियंत्रित होत आहे. त्यामुळे सामान्य डायलिसिसऐवजी त्यांना प्रगत सीआरआरटी थेरपी सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ही थेरपी किडनी फेल्युअरसाठी सामान्य डायलिसिस उपचारापेक्षा चांगली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार "जेव्हा रुग्णाला शॉक लागतो तेव्हा डायलिसिसऐवजी सीआरआरटी मशीनचा वापर करणे चांगले आहे, जे एक अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. कंटिन्युअस रेनल रिप्लेसमेंट थेरपी (सीआरआरटी) मशीन रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवली जाते. खरं तर सामान्य डायलिसिस मशीन एका मिनिटात 500 मिली रक्त घेते, तर सीआरआरटी मशीन कमी रक्त वापरते. याचा एक मोठा फायदा असा आहे की सामान्य डायलिसिस 2 ते 4 तासात केले जाते. तर CCRT सतत चालू राहते. यामुळे शरीरातील क्रिएटिनची पातळी राखण्यात अधिक मदत होते, तसेच किडनी बरी होण्याची शक्यता वाढते.
मुलायमसिंग यादव यांची प्रकृती सुधारण्यासाठी एम्स दिल्ली आणि लखनऊच्या डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात येत आहे. मंगळवारी लखनौ आणि दिल्लीतील तज्ज्ञांनी मेदांता रूग्णालयात येऊन सल्ला दिला. डॉक्टरांपूर्वीच मुलायमसिंह यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत. तज्ज्ञांची टीम यादव यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि कमी रक्तदाबाच्या तक्रारींमुळे मुलायम सिंह यादव यांना गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जनरल वार्डमध्ये उपचार सुरू होते. परंतु, रविवारी त्यांची पृकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.