एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप म्हणतं, ही तर 'सोनिया काँग्रेस'
"आजची काँग्रेस प्रणव मुखर्जींची काँग्रेस नाही, ती 'सोनिया काँग्रेस' आहे. प्रणव मुखर्जी ज्या काँग्रेसमधून आले, ती काँग्रेस आज राहिली नाही. आजच्या काँग्रेसचे अधिकृत नाव 'सोनिया काँग्रेस' हेच आहे."
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आता थेट काँग्रेसच्या नावावरच प्रश्न उपस्थित केला आहे. आजची काँग्रेस ही 1952 साली नोंदणी झालेली काँग्रेस नसून, 'सोनिया काँग्रेस' आहे, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी एबीपी माझाच्या 'माझा विशेष' या चर्चात्मक कार्यक्रमात केले. भंडारी यांचे विधान काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी खोडून काढले असून, ते म्हणाले, निवडणूक आयोगाच्या नोंदीतही काँग्रेसचं नाव 'इंडियन नॅशनल काँग्रेस' असेच आहे.
माधव भंडारी नेमकं काय म्हणाले?
"आजची काँग्रेस प्रणव मुखर्जींची काँग्रेस नाही, ती 'सोनिया काँग्रेस' आहे. प्रणव मुखर्जी ज्या काँग्रेसमधून आले, ती काँग्रेस आज राहिली नाही. आजच्या काँग्रेसचे अधिकृत नाव 'सोनिया काँग्रेस' हेच आहे.", असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले.
"आज देशामध्ये जो पक्ष काँग्रेस म्हणून वावरतो, तो 1952 साली नोंदवलेला इंडियन नॅशनल काँग्रेस नाही. 1952 साली इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणून ज्या पक्षाने नोंदणी केली, तो पक्ष 1969 साली फुटला. त्याच्यामधून इंडियन नॅशनल काँग्रेस (आय) हा पक्ष वेगळा झाला आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (ओ) असा दुसरा पक्ष निर्माण झाला. त्याच दिवसापासून या देशात 1952 चा इंडियन नॅशनल काँग्रेस नाही.", असे भंडारी म्हणाले.
तसेच, माधव भंडारी पुढे म्हणाले, "इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसही पुढच्या काळात फुटली आणि त्या पक्षानेही आपलं नाव बदललं. नंतर मध्यंतरीच्या काळात सोनिया गांधी आणि सीताराम केसरी यांच्यामध्ये जे मतभेद झाले, त्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस फुटली. त्यामुळे आजची काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस (एस) या नावाने पुढे आली. त्यामुळे 1952 ची इंडियन नॅशनल काँग्रेस आज देशात नाही, ही वस्तुस्थिती आहे."
रत्नाकर महाजनांनी भंडारींचे विधान खोडून काढले!
माधव भंडारी यांच्या विधानाची खिल्ली उडवत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन म्हणाले, "माझ्या ज्ञानात भर पडली की, आताच्या काँग्रेसचे अधिकृत नाव 'सोनिया काँग्रेस' असे आहे. ही किती मोठी ऐतिहासिक माहिती आज माझ्या मनामध्ये जमा झाली. म्हणजे आम्ही आतापर्यंत असे समजत होतो की, या पक्षाचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असे आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीतही हेच नाव आहे. आणि आता मला समजतं आहे की, आमच्या पक्षाचं नाव 'सोनिया काँग्रेस आहे'...वाह वाह वाह... नमस्कार या विद्वत्तेला."
"आजची काँग्रेस ही इंडियन नॅशनल काँग्रेस या नावानेच ओळखली जाते. आपण निवडणूक आयोगाची संबंधित कागदपत्र किंवा विविध सरकारी अधिकृत कागदपत्रांमध्ये जर बघितलं, तर पक्षाचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असेच आहे. 125 वर्षांच्या या पक्षात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी स्थित्यंतरं झालेली आहेत. मुळात संघ परिवार आणि भाजपच्या लोकांना इंडियन नॅशनल काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीतील वारशाची भिती वाटते आणि आपण त्यात कुठेही नसल्याने आपलं नाव कुठेही येत नाही, याचा त्यांना न्यूनगंड वाटतो म्हणून ते दिशाभूळ करणारे वक्तव्य ते वारंवार करत असतात.", असे म्हणत रत्नाकर महाजनांनी विस्तृतपणे स्पष्ट केले.
तसेच, संघ परिवाराने इतिहासाचे विकृतीकरण करणारे वक्तव्य थांबवली पाहिजेत, अन्यथा हे डावपेच त्यांच्याच अंगावर येतील, असेही रत्नाकर महाजन म्हणाले.
भाजप आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील या दोन प्रवक्त्यांनी यासंदर्भात मतं मांडली आहेत. मात्र पुढील काळात राष्ट्रीय स्तरावर याबाबत चर्चा-प्रतिचर्चा होते का, किंवा दोन्ही पक्षातील कुणी राष्ट्रीय स्तरावरील नेता यावर काही विधान करतं का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'माझा विशेष'मधील यासंदर्भातील चर्चा खालील व्हिडीओमध्ये ऐकता येईल :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement