Tamil Nadu : तामिळनाडूच्या स्टॅलीन सरकारमध्ये 'गांधी' आणि 'नेहरूं'चा समावेश
डीएमके (DMK) पक्षाचे प्रमुख स्टॅलीन (MK Stalin) यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात गांधी आणि नेहरू नावाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
चेन्नई : नावात काय आहे? असं अनेकदा विचारलं जातं. तंस पहायला गेलं तर नावातच सर्व काही आहे. आपण जर तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळावर एकदा नजर फिरवली तर त्याची प्रचीती येईल. या नव्या मंत्रिमंडळात गांधी, नेहरु आणि स्टॅलीन या नावांचा समावेश आहे.
द्रविड मुन्नेत्र कझगम अर्थात डीएमकेचे नेते एमके स्टॅलीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने तामिळनाडूमध्ये मोठा विजय प्राप्त केला. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी आज सकाळी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्या मंत्रिमंडळात के.एन. नेहरु आणि आर. गांधी यांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे स्वत: स्टॅलीन यांचे नाव हे रशियन क्रांतिकारक आणि समाजवादी नेते स्टॅलीन यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात आता स्टॅलीन यांना गांधी आणि नेहरु रिपोर्ट करतील असं चित्र आहे.
के.एन. नेहरु यांची सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री म्हणून निवड झाली आहे तर आर. गांधी यांची टेक्स्टाईल मंत्री म्हणून निवड झाली आहे. के.एन. नेहरु हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 1989 पासून ते तिरूची वेस्ट या मतदारसंघातून सातत्याने विजयी होत आहेत. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ठेवलं होतं. तर आर. गांधी हे राणीपेट या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते 1996 साली पहिल्यांदा विजयी झाले होते.
Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu.
— ANI (@ANI) May 7, 2021
He is being administered the oath by Governor Banwarilal Purohit pic.twitter.com/e8IZT1aNFz
मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पूर्ण नाव हे मुथुवेल करुणानिधी स्टॅलीन असं आहे. सोव्हिएत रशियाचे क्रांतिकारक आणि समाजवादी नेते स्टॅलीन यांच्या नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आलं आहे. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर 2018 साली ते डीएमकेचे अध्यक्ष बनले.
तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये डीएमकेने 133 जागा जिंकल्या आहेत तर विरोधी असलेल्या एआयडीएमके पक्षाने 66 जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत डीएमकेला 32 जागांचा फायदा झाला असून डीएमकेच्या विजयात स्टॅलिन यांचा सिंहाचा वाटा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- India Corona Cases Yesterday : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे कोरोनाबाधित, तर 3,915 रुग्णांचा मृत्यू
- PM modi Corona Review Meeting : पंतप्रधान मोदींकडून देशातील कोरोना स्थितीचा आढावा, लसीकरण मोहीम जलद करण्याच्या सूचना
- Rabindranath Tagore Jayanti 2021 : देशात आज साजरा होतोय रविंद्रनाथ टागोर यांचा 160 वा जन्मदिवस