(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल, म्हणाले...
आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकरी कायद्यांविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. ते ट्रॅक्टर चालवत संसद भवन परिसरात दाखल झाले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आवाज थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्ष शेतकरी कायद्यांच्या मुद्द्यांवरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर सातत्यानं टीकेची झोड उठवत आहेत. अशातच आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकरी कायद्यांविरोधातील आंदोलनात सहभागी झाले.
राहुल गांधी आज स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. राहुल गांधी जो ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले, त्यावर एक बॅनर लावण्यात आला होता. ज्यावर 'शेतकरी विरोधी तीन काळा कृषी कायदे मागे घ्या, मागे घ्या' असं लिहिलं होतं.
संसदेत पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यात येत आहे. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील. हे कायदे 2-3 मोठ्या उद्योजकांसाठी तयार करण्यात आले आहेत. हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाहीत. हे काळे कायदे आहेत."
आज शेतकऱ्यांकडून 'महिला शेतकरी संसद'चं आयोजन
तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचे आठ महिने पूर्ण होण्याचं औचित्य साधत शेतकऱ्यांनी जंतर-मंतरवर शेतकरी संसदेचं आयोजन केलं आहे. संयुक्त शेतकरी मोर्चा संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर 22 जुलैपासून जंतर-मंतरवर तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.
काँग्रेसकडून लोकसभेत 'पेगासस' रिपोर्टवर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत 'पेगासस प्रोजेक्ट' रिपोर्टवर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. असा आरोप आहे की, 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल फोन नंबर इजराइली कंपनी एनएसओच्या पेगासस स्पायवेअरमार्फत हॅकिंगसाठी निशाण्यावर आहेत. दरम्यान, सरकार या प्रकरणी विरोधी पक्षांच्या सर्व आरोप फेटाळून लावत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :