एक्स्प्लोर
बेळगावात मराठा मोर्चाच्या संयोजकांवर कन्नड पोलिसांची दडपशाही
बेळगाव : गुरुवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला अडथळे आणून संयोजकांवर दडपशाही करण्याचा पोलीस खात्याने प्रयत्न सुरु केला आहे. संयोजकांवर गुन्हे दाखल करणे, तोंडी स्टेज उभारायला परवानगी देणे पण स्टेज घालताना शिवीगाळ करून स्टेजचे काम थांबवायचे असे प्रकार पोलीस खात्याने सुरु केले आहेत.
पोलीस खाते कितीही अडथळे आणले आणि दडपशाही करायचा प्रयत्न केला तरी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच संयोजक या भावनेतून यशस्वी करायला पाहिजे असे आवाहन देखील संयोजक प्रकाश मरगाळे समस्त मराठा समाज आणि मराठी भाषिकांना केले आहे. पोलीस खाते निष्कारण वातावरण गढूळ करून शांततेत निघणाऱ्या मोर्चाच्या मार्गात बिब्बा घालण्याचा प्रयत्न करत आहे अशीच सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहे.
मंगळवारी संयोजक प्रकाश मरगाळे, राजेंद्र मुतगेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, प्रकाश शिरोळकर, गुणवंत पाटील, सुनील जाधव आदींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ असे लिहिलेले टी शर्ट विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन वातावरण गढूळ करत आहात. सोशल मीडियावरून देखील दोन भाषिकात तेढ निर्माण होईल असे मेसेज पाठवून शांतताभंग करण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
मोर्चाची सांगता धर्मवीर संभाजी चौक येथे होणार असून तेथे स्टेज उभारण्यास पोलिसांनी तोंडी परवानगी दिली होती पण प्रत्यक्ष स्टेज उभारायला प्रारंभ झाल्यावर पोलिसांनी शिवीगाळ करून स्टेज उभारण्याचे काम बंद करायला लावले. आता कार्यकर्ते आणि संयोजक यांनी कोणत्याही परिस्थितीत स्टेज उभा करण्याचा निश्चय केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या दहा संयोजकांवर मंगळवारी पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल करून मोर्चाची तयारी करण्याऐवजी जामीन आणि इतर सोपस्कारात संयोजकांना गुंतवून ठेवले. पोलीस उपायुक्त जी. राधिका यांच्यासमोर पाच लाखाचा प्रत्येकी जामीन देऊन संयोजकांना जामीन मिळाला आहे . पुन्हा या प्रकरणाची सुनावणी उदयाला म्हणजे बुधवारी होणार आहे. वकील महेश बिर्जे, अमर येळ्ळूरकर आणि अन्य वकिलांनी जामीन मिळवून देण्यासाठी जबाबदारी पार पडली.
गुरुवारच्या मराठा क्रांती मोर्चासाठी समस्त मराठा समाज आणि मराठी भाषिक सज्ज झाले असून शहरात भगवे ध्वज ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मोक्याच्या ठिकाणी भले मोठे होर्डिंग लावले आहेत. भगवे ध्वज आणि अन्य साहित्यांची विक्री शहर आणि उपनगरात केली जात आहे.
सर्वत्र मोर्चाला उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे. पूर्वीचे राग लोभ, रुसवे फुगवे विसरून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा यशस्वी करून आपल्या ताकदीचे दर्शन घडवायचे या एकाच इर्षेने कार्यकर्ते झटत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील याची ग्वाही गावकरी देत आहेत.
मोर्चाच्या मार्गात पोलीस खात्याने कितीही अडथळे आणले तरी आहे त्या परिस्थितीत मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार संयोजकांनी केला आहे. मराठा समाज आणि मराठी भाषिकांनी गुरुवारचा मोर्चा यशस्वी करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. खोटेनाटे आरोप घालून पोलीस खाते मोर्चाच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण कितीही अडथळे आले तरी मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होणार. जनतेने मोर्चासाठी सहकार्य करून मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन संयोजक प्रकाश मरगाळे यांनी केले आहे .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement