(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi UP Visit: उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची लगबग, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवसात चार वेळा यूपीच्या दौऱ्यावर
PM Modi’s Visits to Uttar Pradesh : पुढील वर्षी सात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपसह इतर सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
PM Modi’s Visits to Uttar Pradesh : पुढील वर्षी सात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापैकी सर्वात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश होय. सत्ताधारी भाजपसह इतर सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकाची लगबग सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारात उतरल्याचं दिसत आहेत. कारण, पुढील दहा दिवसांत ते चार वेळा उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 18 ते 28 डिसेंबर या दहा दिवसांत चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (PM UP Visit)
18 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा एक्सप्रेस वेची ( Ganga Expressway ) पायाभरणी करणार आहेत. हा द्रुतगती महामार्ग देशभरात जलद गतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित आहे. 594 किमी लांबीचा हा सहा पदरी एक्सप्रेसवे 36,200 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. मेरठमधील बिजौली गावाजवळून सुरू होणारा हा एक्सप्रेसवे प्रयागराजमधील जुडापूर दांडू गावापर्यंत जाणार आहे. हा महामार्ग मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बुदौन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराजमधून जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर, हा उत्तर प्रदेशचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग बनेल आणि राज्याच्या पश्चिम आणि पूर्व भागांना जोडेल. हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन टेक ऑफ आणि लँडिंगसाठी 3.5 किमी लांबीची हवाई पट्टीका (एअर स्ट्रीप) देखील शाहजहानपूरमधील एक्सप्रेस वेवर बांधण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गाजवळ एक औद्योगिक कॉरिडॉर देखील बांधण्याचा प्रस्ताव आहे. द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन इत्यादींसह अनेक क्षेत्रांना चालना मिळेल. यामुळे या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.
प्रयागराजमध्ये जाणार पंतप्रधान मोदी -
21 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 21 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी प्रयागराज येथे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयागराज दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी तब्बल अडीच लाख महिलांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
चार पदरी रस्त्याची पायाभरणी -
23 डिसेंबर रोजी पंतप्रधान पुन्हा एकदा काशीच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी लहरतारा ते मोहनसराय यादरम्यान होणाऱ्या चार पदरी रस्त्याची पायाभरणी करणार आहेत. यादिवशी पंतप्रधान काशीमधील जनतेला 1500 कोटी रुपयांची भेट देणार आहेत. त्याशिवाय 28 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर दौऱ्यावर आहेत. कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोचं लोकार्पण करणार आहेत.