एक्स्प्लोर
15 हजार गाड्या, 11 किमी लांबीची रॅली, मोदींचा सूरतमध्ये मेगा रोड शो
सूरत : पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सूरतमध्ये पाऊल ठेवलं. 11 किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये मोदी सहभागी झाले. या रॅलीमध्ये 15 हजार दुचाकींचा समावेश आहे. यामध्ये 90 महिला दुचाकीस्वार आहेत.
सूरत विमानतळापासून सुरु झालेल्या या मेगा रोड शोमध्ये मोदींनी खुल्या जीपमधून प्रवास केला. रोड शोसाठी संपूर्ण सूरत शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदी मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोदींचं सूरतमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. यासाठी संपूर्ण शहर विमानतळापासून ते विश्रामगृहापर्यंत सजवण्यात आलं होतं. रस्त्याच्या दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे. मोदींचा मुक्काम सूरतच्या विश्रामगृहामध्येच असणार आहे. स्थानिक भाजप नेत्यांसोबत मोदी रात्री संवाद साधतील. त्यानंतर ते सोमवारी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण गुजरातमध्ये भाजपला अधिक बळकट करण्यासाठी मोदींचा हा दौरा असल्याचं मानलं जातं. म्हणूनच पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या डायमंड सिटीत म्हणजे सुरतमध्ये मोदींनी रोड शो घेतला. आरक्षणावरून नाराज असलेल्या पाटीदार समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न मोदी या दौऱ्यात करणार आहेत.
भाजपने मोदींच्या नेतृत्वात गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. हे शक्तीप्रदर्शन त्याचाच एक भाग आहे. ओदिशा विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काल भाजपच्या वतीने भुवनेश्वरमध्ये भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. भुवनेश्वरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.
2019 साठीचं नवं लक्ष्य म्हणून ओदिशा भाजपच्या रडारवर आहे. ओदिशासह पूर्व किनारपट्टीवरच्या आसपासच्या भागांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न म्हणून यावेळी भाजपनं त्यांच्या ‘लूक इस्ट पॉलिसीअंतर्ग’ओदिशाची निवड केल्याचं समजतं आहे.
नुकत्याच ओदिशात ज्या स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपनं आश्चर्यकारकरित्या यश मिळवलं आहे. काँग्रेसला मागे टाकत ओदिशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. त्यामुळे 2019ला बिजू जनता दलाला कडवं आव्हान देण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.
ओदिशात लोकसभेच्या 21, तर विधानसभेच्या 147 जागा आहेत. लोकसभेवेळीच ओदिशातही विधानसभा निवडणुका होतात. मात्र 2014 मध्ये देशात इतरत्र मोदी लाटेचा जलवा असताना ओदिशात मात्र अवघ्या एका जागेवर भाजपला समाधान मानावं लागलेलं होतं. यावेळी ती कसर भरुन काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सगळं भुवनेश्वर या अधिवेशनाच्या निमित्तानं भगवं झालं आहे.
संबंधित बातमी : भुवनेश्वरमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक, पंतप्रधान मोदींचा रोड शो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement