PM Modi Mann Ki Baat Live : लसीकरण कार्यक्रमाला लाभलेलं यश भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन : पंतप्रधान मोदी
PM Modi Mann Ki Baat Live :
PM Modi Mann Ki Baat Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे, सर्वाच्या प्रयत्नांच्या मंत्रशक्तिचं प्रत्यंतर दाखवत आहे. 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मित्रांनो, 100 कोटीचा आकडा खूप मोठा आहे, परंतु त्याच्याशी अनेक लाखो लहान लहान प्रेरक आणि अभिमानास्पद असे अनेक अनुभव, उदाहरणं जोडली गेली आहेत. खूप लोक मला पत्र लिहून विचारतात की, लसीकरणाच्या सुरूवातीलाच या अभियानाला इतकं मोठं यश मिळेल,असा विश्वास आपल्याला कसा वाटत होता? मला हा विश्वास यासाठी वाटत होता कारण, मला आपला देश, आपल्या देशाच्या लोकांची क्षमता अगदी चांगली माहित आहे. मला माहित होतं की, आपले आरोग्य कर्मचारी देशवासियांच्या लसीकरणात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धारानं एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानं मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला.त्यांच्या बाबतीत तर अशी असंख्य उदाहरणं आहेत की, त्यांनी कशी सर्व आव्हानांना पार करून जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कवच प्रदान केलं. आपण अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये वाचलं आहे, बाहेरही ऐकलं आहे की, हे काम करण्यासाठी आपल्या लोकांनी किती कष्ट केले आहेत, एकापेक्षा एक प्रेरक उदाहरणं आपल्या समोर आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, मी आज मन की बातच्या श्रोत्यांची भेट उत्तराखंडच्या बागेश्वर इथली एक आरोग्य कर्मचारी पूनम नौटियाल हिच्याशी घडवू इच्छितो. मित्रांनो, बागेश्वर उत्तराखंडच्या त्या धरतीवर आहे. ज्या उत्तराखंडने शंभर टक्के पहिला डोस देण्याचे काम पूर्ण केलं आहे.उत्तराखंड सरकारही अभिनंदनाचं पात्र आहे, कारण खूप दुर्गम क्षेत्र आहे,तसंच, हिमाचलनंही अशा अडचणींवर मात करत 100 टक्के डोस देण्याचं काम पूर्ण केलं आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, पूनमजींनी आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या लसीकरणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 82 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.