पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला सायबर युद्धाचा अलर्ट; महाराष्ट्राच्या सायबर सेलचा धक्कादायक रिपोर्ट
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर अटॅकच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. हे फक्त डिजिटल हल्ले नाहीत, तर एक संघटित सायबर युद्ध सुरू असल्याचं सायबर सेलच्या प्रमुखांनी सांगितले.

Pahalgam Terror Attack Cyber Attack: जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतावर आणखी नव्या हल्ल्याचं सावट उभं राहिलंय. या हल्ल्याला सायबर वॉरफेअर (सायबर युद्ध) असे म्हटलं जात आहे. महाराष्ट्र सायबर सेलने ‘इकोज ऑफ पहलगाम’ या नावाने एक अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये 23 एप्रिलनंतर भारतावर जवळपास 10 लाख सायबर हल्ले झाल्याचे उघड झाले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर अटॅकच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. हे फक्त डिजिटल हल्ले नाहीत, तर एक संघटित सायबर युद्ध सुरू असल्याचं महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी ABP न्यूजला सांगितले.
कोणत्या देशांमधून होतायत सायबर हल्ले ?
सायबर सेलच्या या अहवालानुसार हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया येथून होत आहेत. हे सर्व हॅकिंग ग्रुप्स स्वतःला इस्लामिक संघटना असल्याचे सांगतात. यामध्ये Team Insane PK हा पाकिस्तानी APT (Advanced Persistent Threat) ग्रुप सर्वाधिक सक्रिय आहे. या ग्रुपने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक वेल्फेअर आणि अनेक आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाईट्सवर हल्ले केले आहेत.
या सायबर हल्ल्यांमध्ये वेबसाईट डिफेसमेंट, CMS एक्स्प्लॉइटेशन, आणि कमांड अँड कंट्रोल अटॅक्स यांचा समावेश आहे. याशिवाय Mysterious Team Bangladesh (MTBD) आणि इंडोनेशियातील Indo Hax Sec हे ग्रुप देखील सक्रिय असून त्यांनी भारतीय टेलिकॉम डेटा आणि स्थानिक प्रशासनाच्या पॅनल्सवर हल्ले केले आहेत.
रेल्वे, बँकिंग, सरकारी पोर्टल यंत्रणा धोक्यात
हे सर्व सायबर हल्ले 26 एप्रिलपासून सुरू झाले असून काही हल्ले यशस्वी देखील ठरले आहेत. महाराष्ट्र सायबरने काही हल्ले रोखले असले तरी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टल्ससारख्या महत्वाच्या यंत्रणांवर धोका निर्माण झाला आहे. अहवालात असेही नमूद आहे की अनेक ठिकाणी सायबर सुरक्षेतील त्रुटींमुळे हे हल्ले यशस्वी झाले.
सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
डार्क वेबवर भारतीय टेलिकॉमचा टेराबाईट डेटा लीक करण्यात आल्याचेही उघड झाले आहे, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यशस्वी यादव यांनी सांगितले की, "एजन्सींनी सायबर सिक्युरिटी बळकट करावी, रेड टीम असेसमेंट, DDoS फेलओवर टेस्ट आणि सिस्टिम ऑडिट अनिवार्य करावे" अशी विनंती करण्यात आली आहे.
हेही वाचा:























