PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी
PFI Ban : केंद्र सरकारने पीएफआयवरील बंदीचे विरोधकांनी स्वागत केले असून आता समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
![PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी opposition welcome ban on pfi also demand ban on rss for communalism PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/129888bd4b32e8fc28b79b38fc090f761664352984754290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PFI Ban : हिंसाचार आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यांवरून केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India-PFI) या संघटनेवर बंदी घातली आहे. या बंदीचे स्वागत करताना विरोधकांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी (Ban on RSS) घालण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांनी संघावर बंदीची मागणी केली आहे. तर, लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद के. सुरेश यांनीदेखील पीएफआय आणि संघ एकसारखेच असून संघावर बंदीची मागणी केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली आहे. पीएफआयकडून देशाच्या संविधानावर अविश्वास व्यक्त करण्यात येत असून त्यांना 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितला. देशातील विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारातही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. छुप्या अजेंड्यानुसार समाजातील एका वर्गाला कट्टरतावादाकडे वळवून लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत होते. देशाच्या संविधानाबद्दल या संघटनेचा अनादर दिसत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले.
पीएफआय प्रमाणे संघावर बंदी घाला: लालूप्रसाद यादव
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले की, पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे. संघावर आधीदेखील बंदी घालण्यात आली होती. पीएफआय, संघासारख्या इतर संघटनांवर कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले. हिंदू-मुस्लिम करून दुफळी माजवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हिंदू-मुस्लिम करून तणाव करणे, मशिदींवर भगवा झेंडा लावणे या चुकीच्या गोष्टी आहेत. देशात सांप्रदायिकता वाढवून दंगल घडवणे आणि सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले.
पीएफआय-संघ एकसारखेच
काँग्रेसचे लोकसभेतील प्रतोद के. सुरेश यांनीदेखील संघावर बंदी घालण्याची मागणी केली. पीएफआय आणि संघ या दोन्ही संघटना सारख्याच असल्याचे त्यांनी सांगितले. संघदेखील देशभरात जातीयवाद पसरवत आहे. पीएफआय प्रमाणे संघावरही बंदी घातली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस सांप्रदायिकतेच्या विरोधात - जयराम रमेश
काँग्रेस महासचिव आणि माजी केद्रिंय मंत्री जयराम रमेश यांनी काँग्रेस नेहमीच धर्मांधतेच्या विरोधात असल्याचे सांगितले. आम्ही बहुसंख्यवाद अथवा अल्पसंख्याकवादाच्या आधारे धार्मिक उन्मादात पाहत नसल्याचे त्यांनी सांगितले. द्वेष, धार्मिक कट्टरता आणि हिंसाचाराच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्या विचारसरणीचा आम्ही विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बंदीने प्रश्न सुटणार का?
पीएफआयच्या धर्मांध, कट्टरतावादी कारवाया संपुष्टात आल्या पाहिजेत. मात्र, बंदीने हा प्रश्न सुटणार का, असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला. धर्मांधता, हिंसाचार रोखला पाहिजे. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्याने काय साध्य झालं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)