(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई हिंसाचार प्रकरणी गोव्यातून तिघांना अटक
मराठा आरक्षण आंदोलनात हिंसाचारास भडकवणाऱ्या 3 तरुणांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आणि कळंगुट पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
पणजी : मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई येथील कोपरखैराणे काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. आंदोलनात हिंसाचारास भडकवणाऱ्या 3 तरुणांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आणि कळंगुट पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
मराठा आरक्षणासाठी 25 जुलैला मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान भुषण आगसकर, आशिष काळे आणि चंद्रशेखर पाटील या तरुणांनी मोर्चात घुसून हिंसाचार केला. नवी मुंबईत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, मात्र ते नवी मुंबईतून फरार झाले होते.
फरार झालेले तिघे गोव्यात एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मराठा क्रांती मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात 21 वर्षीय तरुणाचा बळी गेला होता. दगडफेकीत हा तरूण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी तरुणाला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या 56 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचं उघड झालं आहे.