Lufthansa Pilots Strike : लुफ्थांसा एअरलाईन्सच्या पायलट्सचा संप, 800 उड्डाणं रद्द, दिल्ली विमानतळावर 700 प्रवासी अडकले
Lufthansa Pilots Strike Start : जर्मनीच्या लुफ्थांसा एअरलाईन्सच्या पायलट्सचा संप पुकारल्याने 800 उड्डाणं रद्द झाली आहेत. दिल्ली विमानतळावर 700 प्रवाशी अडकले आहेत.
Lufthansa Pilots Begin Strike : जर्मनीच्या (Germany) लुफ्थांसा एअरलाईन्सच्या (Lufthansa Airlines) कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम उड्डाणांवर झाला आहे. लुफ्थांसा एअरलाईन्सची 800 उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यामुळे सुमारे 1,30,000 प्रवाशांची अडचणींचा सामना करावा लागला आहे. तर दिल्ली विमानतळावर 700 प्रवाशी अडकले आहेत. रद्द करण्यात आलेल्या फ्लाइट्समध्ये दिल्लीहून फ्रँकफर्ट आणि म्युनिक या दोन फ्लाइटचा समावेश आहे. उड्डाण रद्द केल्यामुळे 700 प्रवासी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर अडकले. या प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी विमानतळावर गोंधळ घातला.
संपामुळे अनेक उड्डाणं प्रभावित
शुक्रवारी जर्मनीतील लुफ्थांसा एअरलाईन्सच्या पायलट्सनी संप पुकारला. यामुळे अनेक उड्डाणं प्रभावित झाली. मुख्य म्हणजे फ्रँकफर्ट आणि म्युनिक येथून सुटणाऱ्या फ्लाईट्सच्या वेळापत्रकांवर परिणाम झाला. अनेक जर्मन राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आहेत, त्यामुळे या संपामुळे अनेक प्रवाशाची गैरसोय होत आहे. दरम्यान लुफ्थांसाच्या उपकंपन्या स्विस, ऑस्ट्रियन, ब्रुसेल्स आणि युरोविंग्ज या संपामुळे प्रभावित होणार नाहीती. कंपनीने सांगितले की, उपकंपन्यांच्या वेळापत्रक कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यांची उड्डाणं नियोजित वेळापत्रकानुसार चालवली जातील. जर विमान आणि कर्मचारी आधीच परदेशात असतील तर, जर्मनीच्या बाहेरून निघणारी उड्डाणं नियोजित वेळेनुसार चालवली जातील.
संतप्त प्रवाशांचा गोंधळ
दरम्यान, वैमानिकांच्या संपामुळे अनेक उड्डाण रद्द झाली. त्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. रद्द करण्यात आलेल्या फ्लाइट्समध्ये दिल्लीहून फ्रँकफर्ट आणि म्युनिक या दोन फ्लाइटचा समावेश असल्याने दिल्ली विमानतळावर 700 प्रवासी अडकले होते. यावेळी प्रवाशांनी गोंधळ घातला. प्रवाशांनी कंपनीला पर्यायी फ्लाईट उपलब्ध करण्याची किंवा तिकीटाचे पैसे परत करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
In the video, @lufthansa
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) September 2, 2022
passengers are shouting at the @DelhiAirport for justice and money back at intervening night of Friday as Lufthansa pilots call a one day world-wide strike over salary appraisal. #Lufthansa #AvGeek pic.twitter.com/xeFUX7H9ZW
संपाविरोधात कंपनीची न्यायालयात धाव
याआधी शुक्रवारी, लुफ्थांसा संपाविरुद्ध तात्पुरत्या मनाईसाठी अपील घेऊन म्युनिक कामगार न्यायालयात गेली, जी न्यायालयाने फेटाळली. महागाईवर आधारित स्वयंचलित समायोजनाद्वारे वेतनात वाढ करण्याची वैमानिकांची मागणी हा बेकायदेशीर संपाचा हेतू होता, असा युक्तिवाद कंपनीने केला होता. "लुफ्थांसाने आधीच्या चर्चेदरम्यान कायदेशीर चिंता व्यक्त करायला हवी होती जेणेकरून या प्रकरणावर चर्चा करता येईल," असे न्यायालयाने म्हटले आहे.
संपकरी पायलट्सची मागणी काय?
पायलट्सच्या युनियन वेरिनिगुंग कॉकपिटने (व्हीसी) लुफ्थांसा कंपनीशी मागण्यांसंदर्भातील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर रात्री संप पुकारला. कंपनीनं वैमानिकांच्या वेतनात 5.5 टक्क्यांनी वाढ करावी अशी संपकरी पायलट्सची मागणी आहे.